कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा
बहिणाबाई तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री - संजय चौधरी
जळगाव दि.३ (प्रतिनिधी) – बहिणाबाई कान्हदेशच्या कवयित्री होत्या असे म्हणणे, म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे ठरेल, त्या तर वैश्विक पातळीच्या महान कवयित्री होय, कारण त्यांनी भूगोलाच्या सीमारेषा कधीच ओलांडल्या आहेत. त्यांचे साहित्य तर साऱ्या विश्वाचे धन होय. आपण भाग्यवान आहोत की, त्यांच्या कविता आपल्यासाठी उपलब्ध आहे, असे सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कविता कशा निर्माण झाल्या ते सोदाहरणसह स्पष्ट करून देश-विदेशातील अनेक कवींचा उल्लेख त्यांनी केला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७३ वा स्मृतिदिन साजरा झाला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, भुसावळ येथील पु. ओ. नाहटा महाविद्यालयाच्या प्रा. वंदना नेमाडे, म्हसावद येथील ज्येष्ठ कवयित्री प्रा. विमल वाणी, अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवव्या इयत्तेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षक यांच्यासह वाड्यातील नागरीक उपस्थित होते. चौधरी वाड्यातील नागरीकांसह सुनंदा चौधरी, दिलीप चौधरी, शोभा चौधरी, सविता चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, शालू चौधरी, कोकिळा चौधरी, दिपाली चौधरी, प्रिया, हितेंद्र, मानव, भानू नांदेडकर, कविता चौधरी, विजय जैन, देवेंद्र पाटील, तुषार हरीमकर उपस्थित होते.
बहिणाबाईंच्या ७३ व्या स्मृतिदिनाच्या औचित्याने ‘स्मरण बहिणाई’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रस्तुत कार्यकमाच्या सुरुवातीला संजय चौधरी व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन झाले. बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी कवी संजय चौधरी यांचे पुस्तके व सुतीहार देऊन हृद्य स्वागत केले. लेवागणबोली दिनाच्या औचित्याने प्रा. वंदना नेमाडे यांनी लेवागणबोलीतील गोडवा, तिचा लहेजा, सौंदर्य इत्यादी सोदाहरण मांडणी केली. बहिणाबाई यांचे काव्य लेवा गणबोलीचा अप्रतिम नमूना असल्याचे त्या म्हणाल्या.
कवयित्री व शिक्षिका माधुरी भट यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातून स्फूरलेली स्वरचित कविता सादर केली. विमल वाणी यांनी भारूड सादर केले. ‘मजाहजा करण्यासाठी नवऱ्याने कुटुंबापासून वेगळे निघावे असा हट्ट करणारी पत्नी तिच्या म्हणण्यातून निर्माण झालेला विनोद’ उपस्थितांमध्ये हशा पिकविणारा ठरला. त्यानंतर त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनावर आधारीत कविताही सादर केली. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनीही बहिणाबाईंच्या कवितांचे वाचन केले.
ज्ञानेश्वर शेंडे यांनी सूत्रसंचालन केले. किशोर कुळकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रम ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांच्या नियोजनात यशस्वी झाला. त्यासाठी प्रदीप पाटील, दिनेश थोरवे, सुभाष भंगाळे यांनी सहकार्य केले.