रावेर (प्रतिनिधी) : विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार धनंजय शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ आज (दि.१२) फैजपूर येथे राज्यसभा खासदार व सुप्रसिध्द कवी इमरान प्रतापगढी यांच्या उपस्थितीत जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला आ.शिरीषदादा चौधरी, माजी आमदार रमेशदादा चौधरी, अब्दुल करीम सालार, प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार मुक्ती हारून साहेब व महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना खासदार इम्रान प्रतापगढी म्हणाले की, गेल्या अडीच वर्षांत राज्यात महायुतीचे सरकार असूनही त्यांनी जनतेच्या हितासाठी सत्ता वापरली नाही. यामुळे शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली, बेरोजगारी वाढली. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडी विकासाची पंचसूत्री योजना राबवणार आहे.
महालक्ष्मी योजनेअंतर्गत स्त्रियांना दरमहा तीन हजार रुपये आणि मोफत बस प्रवास, कृषी समृद्धीसाठी तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारांचे अनुदान, हमीभावाचे आश्वासन, बेरोजगार तरुणांसाठी चार हजार रुपये भत्ता, पंचवीस लाखांचा आरोग्य विमा, जातीनिहाय जनगणना आणि ५०% आरक्षण मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा अशा उपाययोजना राबवणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मतदानातून विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. या जाहीर सभेला परिसरातील नागरिक, तरुण – तरुणी तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.