राष्ट्रभक्त आणि राष्ट्रनेते असही ज्यांच्याविषयी आदरपूर्वक म्हणता येईल अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाने आपल्या सर्वांचा निरोप घेतला आहे. उद्योजकीय जगतात त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा ठसा अनमोल आहेच, दानशूरता म्हटल्यानंतर टाटा हेच नाव अग्रक्रमाने डोळ्यासमोर येते. केवळ टाटा गृपलाच जागतिक स्तरावर त्यांनी नामांकित केल अस नाही तर त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास केला तर हे लक्षात येईल की त्यांनी आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या पटलावर भूषणावह केलं. टाटा गृपची पुनर्रचना त्यांच्या हातून झाली, जागतिक स्तरावर उद्योजक म्हणून कीर्ती संपादन करताना अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे त्यांनी ब्रिटिश स्टील कंपनी विकत घेतली. जग्वार, रेंज रोव्हर बँडसह टेटली टी कंपनीही विकत घेतली. ब्रिटिश उद्योजकीय संस्कृतीतील हे आयकॉनिक ब्रँड समजले जातात. भारतावर दिडशे वर्ष राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या देशातल्या या नामांकीत कंपन्या विकत घेऊन जणू टाटा यांनी भारतीयांच्या हृदयावर गुलामगिरीचा जो डाग कोरला गेला होता, जो आघात झाला होता तो पुसून काढण्याच काम टाटा यांनी केल.
आमचे वडील श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी नेहमी आदरणीय जे.आर.डी. टाटा यांना उद्योजकिय क्षेत्रात गुरुस्थानी मानलं. टाटा गृप व्यवसायाकडे विश्वस्त या दृष्टीने पाहतो तोच विचार एक संस्कार या नात्याने आमच्या वडीलांनी उचलला आणि आज आम्ही कृषी क्षेत्रात जे काम करतो आहे त्या परिवर्तनामागे तीच दृष्टी आहे.
व्यवहार साध्य करत असताना एक यशस्वी, दानशूर व्यक्ती म्हणूनही आपण नावारुपाला येतो हे जरी खरे असले तरी कोणत्याही प्रकारची तडजोड न करताही स्वतःच्या कंपनीला आणि आपल्या देशाला गाैरवास्पद कार्य करून भूषणावह ठरता येते यासाठी आदरणीय टाटांची नोंद भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल.
आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
अशोक भवरलाल जैन
अध्यक्ष
जैन इरिगेशन सिस्टिम्स ली
जळगांव