अमळनेर : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना अठरा रोजी घडली होती. शेतकऱ्याला उपचारासाठी धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता 29 रोजी त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आले आहे.
तालुक्यातील वावडे येथील ज्ञानेश्वर ताराचंद पाटील (वय ५१) या शेतकऱ्याने १८ रोजी विषारी औषध प्राशन केले होते. तर, कर्जबाजारीपणामुळे ते त्रस्त झाले होते, त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील यांनी १८ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात येताच, त्यांना धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना २९ रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. या वेळी कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.