||• महावीर वाणी 6 •||• दि. 07/08/2024 बुधवार
‘लज्जा’ आत्मशुद्धतेचा एक मार्ग - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब
आवाज मराठी जळगाव दि.07/08/2024- आत्मशुद्धतेसाठी चार शुद्ध मार्ग सांगितले जातात. लज्जा, दया, संयम, ब्रह्मचर्य या मार्गावर मनुष्य मार्गस्थ झाला तर त्याचे जीवन कल्याणकारी झाल्याशिवाय राहत नाही. यात लज्जा हे खुप महत्त्वपूर्ण आहे. ‘लज्जा’ म्हणजे मानसिक संकोच होय. परिवार, समाज, देश, कुळाच्या गौरवाची काळजी घेण्यासंबंधित सामाजिक स्तरावर स्वयंशिस्त आवश्यक असते ती म्हणजे ‘लज्जा’ होय. मन संवेदनशील असेल तर चुकीचे किंवा अकरणीय कार्य करताना ती डोळ्यात आली पाहिजे. पुर्वजांकडे आधी हाहाकार, महाकाल, धिटनिती होती त्या समाजातील रिती-भाती-परंपरा विचारांवर प्रभाव टाकत होती. त्यासाठी कुळपुरूष (कुटुंबप्रमुख) आणि पंच नियंत्रण ठेवत. मात्र आधुनिकतेच्या काळात सामाजिक स्तरावर ह्या परंपरा लोप पावत आहे. हा आपल्या संस्कृतीवर थेट आघात आहे. ‘लज्जा’ ही संस्कृतीमधील आत्मा असून ती आपल्या वेशभूषेसह आचार-विचारांमधून दूर जाताना दिसत आहे. त्यासाठी फॅशन आणि व्यसन कारणीभूत आहे. भारतीय संस्कृतीचे जगात कौतूक होत असताना पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण भारतीयांनी करणे चुकीचे आहे. एखाद्या पडणाऱ्याला हात देणे ही आपली संस्कृती असून तिचा कृतिशीलपणे स्विकार करा! असे विचार शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी स्वाध्याय भवन येथील धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकांना दिला.
धनापेक्षा धर्मावर प्रेम करा. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पुत्र, पत्नी यापेक्षा परमार्थाला अधिक महत्त्व द्या. शरिर हे साहित्याप्रमाणे साथ देते. कारण ते येथेच सोडून जावे लागते मात्र आत्मा हा आपल्या सोबत जात असतो. धर्म त्याचे संरक्षण करत असतो. आई-वडिलांची सेवा हे आपले कर्तव्य आहे मात्र तेही आपली साथ सोडून जाऊ शकतात मात्र आत्मा नाही. आत्म्याचा सहारा म्हणजे धर्म होय. धर्माला फक्त औषधी न मानता परिस्थिती प्रतिकूल असो की अनुकूल धर्म आचरण करत रहा. असे विचार आरंभी परमपूज्य भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सांगितले.