जळगाव

आचार्य १००८ श्री रामलालजी म.सा. यांचे शिष्य श्री सुमितमुनिजी म.सा. यांचा चार्तुमास

जैन चार्तुमास - २०२४ च्या नियोजनाची बैठक संपन्न;

जैन स्थानकवासी चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड

आवाज मराठी जळगाव दि. २३ – जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत दिन मोठ्या उत्साहात साजरा केले जाईल. चार्तुमासात परमपूज्य आचार्य भगवंत १००८ श्री रामलालजी म. सा. यांचे आज्ञानुवर्ती शासन दीपक श्री सुमितमुनिजी म. सा., श्री भूतिप्रज्ञजी म. सा., श्रीऋजुप्रज्ञजी म.सा. आदी ठाणा-३ यांच्याकडून ‘जैन दर्शन’ घडणार आहे.

जैन धर्मामधील अत्यंत प्रज्ञावान संतमुनी म्हणून पूज्य सुमितमुनिजी म. सा. सह संतमुनी ओळखले जातात. त्यांचा मोठा शिष्यगण आहे. जैन मुनी आत्मोन्नती बरोबर लोकांना धर्मानुरुप आचारणासाठी प्रेरणा देत असतात. समस्त विश्वामध्ये ‘जैन दर्शन’ ला विशेष महत्त्व आणि ओळख आहे. सत्य, अहिंसा, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूलभूत सिद्धांतामध्ये समस्त मानवजातीच्या उध्दाराचे गुपित सामावले आहे. हे सर्व विस्ताराने जाणून घेण्यासाठी चार्तुमास काळ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्मोजन्मींचा फेरांचे समापन करावयाचे असल्यास व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करावयाचा असल्यास धर्म सिद्धांताच्या वाटेने जावेच लागेल. चार्तुमास काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सुश्रावकांची ये-जा चालू असते. या संतांचा मागील चार्तुमास रतलाम, मध्यप्रदेश येथे होता.

या सभेमध्ये हा चार्तुमास कुण्याही एका संप्रदाय वा पंथाचा नसून समाज व मानव कल्याणासाठी चार्तुमास आहे. या चार्तुमासाच्या कालावधीत सर्वांनी आपआपली जबाबदारी समजून सेवा द्यावयाची आहे. तत्पूर्वी जैन स्थानकवासी चार्तुमास समिती-२०२४ च्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चार्तुमास समितीस सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. त्यांनी जळगाव जैन श्री संघाचा संपूर्ण भारतात असलेला गौरव अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. चार्तुमास समितीस प्रामुख्याने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे नियमित मार्गदर्शन करतील. यावेळी माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी हे शिर्षस्थानी असतील. बैठकीसाठी मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते तसेच सर्वांनी एकदिलाने चार्तुमास उत्साहात संपन्न, यशस्वी करण्याचा निश्चिय केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button