९वीच्या विद्यार्थ्यास शिक्षकांसह मुख्याध्यापकाने केली मारहाण
शाळेतून काढण्याची देखील करण्यात आली कारवाई, बोदवड मधील प्रकार
टीम आवाज मराठी, जिया शेख बोदवड प्रतिनिधि | दिनांक ८ सप्टेंबर २०२३ येथील बोडवड शहरातील उर्दू शाळेतील मुलांसोबत झालेल्या भांडणाच्या विषयावरून नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला शाळेतीलच शिक्षक आणि मुख्याध्यापकाने बेदम मारहाण केल्याची घटना बोदवड येथे घडली आहे. बोदवड शहरात असलेल्या चंद्रकांत हरी बढे उर्दू शाळेत हा प्रकार घडाला आहे. ज्या विद्यार्थ्याला मारहाण झाली आहे, त्यालाच शाळेतूनच देखील काढून टाकल्याने त्या विद्यार्थ्याच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून या संदर्भात दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक वृत्त असे की, बोदवड शहरातील चंद्रकांत बढे उर्दू शाळेत शेख तन्वीर शेख शरीफ मणियार (वय १४) हा विद्यार्थी नववीत शिक्षण घेत आहे. २४ ऑगस्ट रोजी तनवीरचे शाळेतील मुलांसोबत भांडण झाले. या कारणावरून शिक्षक अत्तर उल्ला खान शाहीद उल्ला खान (रा. मलकापूर) यांनी त्यास मुख्याध्यापक नदीम खान (रा. भुसावळ) यांच्या कार्यालयात त्या विद्यार्थ्याला नेलं. त्यानंतर तन्वीर यास शिवीगाळ करून चापटबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली.
मारहाणीच्या घटनेनंतर २९ ऑगस्टला तन्वीर शाळेत गेला. मात्र, त्याला शाळेत जाण्यास उशीर झाल्याने मुख्याध्यापक कार्यालयात अत्तर उल्ला खान व मुख्याध्यापक नदीम खान यांनी पुन्हा लोखंडी पाइप व बुक्क्यांनी मारहाण केली. सोबत शाळा सोडल्याचा दाखला देऊन त्याला घरी पाठविण्यात आले होते. त्यामुळे तन्वीरच्या वडिलांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. आणि यासंदर्भात बोदवड पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.