सोन्याची पोत लंपास केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी आवळल्या चोरट्यांच्या मुसक्या, तुटलेली अर्धवट पोत हस्तगत..!
एरंडोल पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत सापळा रचून आरोपींना जेरबंद केले.
उमेश महाजन | आवाज मराठी एरंडोल | दिनांक २८/८/२०२३ एरंडोल येथील मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या महिलेची सोन्याची पोत लंपास केल्याप्रकरणी एरंडोल पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत सापळा रचून आरोपींना जेरबंद केले. चोरट्यांकडून अर्धवट तुटलेली सोन्याची पोत जप्त करण्यात आली.
एरंडोल पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे, पोलिस उपनिरीक्षक शरद बागल, पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, मिलींद कुमावत, अकील मुजावर यांनी चाळीसगाव येथे जाऊन सापळा रचला. यावेळी आरोपींना संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपींचा पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींना नाव व पत्ता विचारले असता त्यांचे नाव सैय्यद तोशिब सैय्यद अली वय-२४वर्षे रूम नंबर १०/११ बिल्डिंग नंबर ०९ पिंप्राळा, हुडको- जळगांव, आकाश राजू खरे वय २० वर्षे, दूध फेडरेशन, ‘बी, बिल्डिंग च्या गच्चीवर, चार मजली बिल्डिंग, जळगांव असे सांगण्यात आले. दरम्यान, दोन्हीं चोरट्यांकडून चोरी झालेली १८ग्रॅम वजनाची सोन्याची अर्धवट तुटलेली पोत हस्तगत करण्यात आली.
एरंडोल येथील विमलबाई लक्ष्मण चौधरी या मॉर्निंग वॉक साठी पहाटे फिरायला जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करून पोबारा केला होता. ही घटना शासकीय विश्राम गृहासमोर गुरूवारी सकाळी घडली.