मुंबई/जळगाव दि. १६ (प्रतिनिधी) – कृषीक्षेत्राला पाईप, ठिबक, माध्यमातून पाणी बचतीतून समृद्धी घडविण्यासाठी मोलाची भूमिका निभावणाऱ्या जागतिक किर्तीच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीला प्लास्टीक उत्पादनांच्या विविध गटांतून २०२३ – २०२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षासाठी आठ निर्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. आज (दि.16) मुंबई येथील हॉटेल द लीला येथे हा पुरस्कार समारंभ झाला. प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (प्लेक्सकॉन्सिल) च्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्कारामध्ये जैन इरिगेशनने हॅट्रीक केली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष अनिल जैन यांनी वरिष्ठ सहकारी डॉ. अनिल पाटील, व्ही. एम. भट, डॉ. बालकृष्ण यादव, राजेंद्र महाजन, एस. एन. पाटील, के. बी. सोनार, सुचिता केरावंत, दिपा शिवदे यांच्यासोबत पुरस्कार स्विकारले.

भारतीय प्लास्टिक उद्योगातील उत्कृष्टतेची ७० वर्षे साजरी करत असताना आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा हा सन्मान सोहळा होता. प्लेक्स कौन्सिल प्लॅटिनम ज्युबिली सेलिब्रेशन आणि एक्सपोर्ट एक्सलन्स अवॉर्ड्स सोहळ्यासाठी ज्येष्ठ उद्योजक एम. पी. तापडिया, विधानसभेचे अध्यक्ष राहुल सुरेश नार्वेकर, रविश कामत, प्लेक्स कौन्सिल चे अध्यक्ष विक्रम बधोरीया, उपाध्यक्ष सचिन शहा, हेमंत मेनोचा, श्रीबश दशमोहपात्रा यांची उपस्थिती होती. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
जैन इरिगेशन कंपनीने २०२३-२४ व २०२४-२५ वर्षांसाठी पाईप्स आणि होसेस (प्लास्टिकच्या) फिटिंग्ज श्रेणीमध्ये निर्यात उत्कृष्टता पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून निवड झाली आहे. त्यात जैन ठिबक सिंचन विभागामध्ये निर्यातीसाठी २०२३-२४ साठी प्रथम पारितोषिक, फिटींग्ज पाईप होसेस विभागाने द्वितीय क्रमांक, पाईप होसेस विभागाने प्रथम क्रमांक, पीव्हीसी फोन शीट विभागातील निर्यातीमुळे प्रथम क्रमांचे पारितोषक कंपनीला मिळाले. तर २०२४-२५ साठी ठिबक सिंचन मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले, फिटिंग्ज पाईप आणि होसेस विभागाला द्वितीय, पाईप होसेसमध्ये उत्कृष्ट निर्यातीसाठी द्वितीय तर पीव्हीसी फोम शीट विभागाने सलग प्रथम क्रमांचे पारितोषिक कंपनीला मिळाले. यावेळी मुंबई कार्यालयातील एकनाथ महाकाळ, किसन वरे, शिवा तुपे यांनी पुरस्कार सोहळ्यासाठी समन्वय साधला. विक्रम बधोरिया यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. राहुल नार्वेकर यांनीसुद्धा मनोगत व्यक्त केले.
प्लेक्स कौन्सिल ही भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग विभागाद्वारे १९५५ मध्ये स्थापन केलेली संस्था आहे. भारतातील प्लास्टिकमधील वेगवेगळ्या क्षेत्रातील निर्यातीत सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या उद्योगांना प्लेक्स कौन्सिल पुरस्कार देते. मानचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चा प्लास्टीक उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादन आणि निर्यातीबद्दल प्लेक्स कौन्सिलतर्फे १९९१ पासून दरवर्षी सन्मान होत आला आहे.
चौकट..
प्लास्टिक क्षेत्रामुळे अर्थव्यवस्थेमध्ये शाश्वतता – पियुष गोयल
प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL) ने १६ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे निर्यात उत्कृष्टता पुरस्कारांचे आयोजन केले हा प्रोत्साहन पर सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या भारताच्या उत्पादन आणि निर्यात क्षमतांना बळकटी देण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, “मेक इन इंडिया” सारख्या उपक्रमांना, प्लास्टिक क्षेत्रात शाश्वतेतुन अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देते. जगाशी स्पर्धा करीत भारताच्या प्लास्टिक क्षेत्राला तांत्रिक उत्कृष्टता आणि शाश्वत विकासाचे केंद्र म्हणून स्थान दिले आहे. असे मनोगत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले. प्लास्टिक एक्सपर्ट प्रमोशन कौन्सिल (PLEXCONCIL) त्यांच्या ७० वर्षांच्या समर्पित सेवेचे प्लॅटिनम जयंती साजरी करताना २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांसाठी आघाडीच्या निर्यातदारांना एक्सपर्ट एक्सलन्स अवॉर्ड्सने सम्मानित करण्यात आले. प्लास्टिक एक्सपर्ट प्रमोशन कौन्सिल परिषदेने गेल्या काही वर्षांत आपल्या सदस्यांना जागतिक मूल्य साखळींशी एकरूप होण्यास आणि सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय प्लास्टिक उत्पादनांची स्पर्धात्मकता आणि प्रतिष्ठा वाढली असल्याचे ते म्हणाले. जीएसटी कमी झाल्यापासून भारतीय अंतर्गत बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे जगात गुणवत्तापूर्ण उत्पादने व शाश्वत उत्पादनामुळे प्लास्टिक उद्योगाला भविष्य आहे.
कोट…
‘गुणवत्ता ही बाजारपेठेमध्ये विकत मिळत नसते तर ती प्रत्यक्ष जीवनात उतरावी लागते’ हे श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंचे विचार प्रत्येक सहकाऱ्यांमध्ये संस्कारीत झाले आहे. यातून कृषी क्षेत्रामध्ये शाश्वतता आणण्यास प्रत्येक सहकारी प्रयत्न करत आहे. प्लास्टिककल्चरतून शेतीला कमीत कमी संसाधनातून उत्कृष्टतेकडे घेऊन आले आहे. जैन इरिगेशनच्या सहा दशकाच्या कार्याला अधोरेखित करुन १९९१ पासून ही पारितोषिके प्राप्त होत आहे. कंपनीच्या विविध विभागांमध्ये कार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांचा व भूमिपुत्रांच्या कष्टांना समर्पित हा पुरस्कार असल्याचे मी मानतो.
– अशोक भवरलाल जैन अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव




