जळगाव दि. १४ (प्रतिनिधी) – शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक हायटेक शेतीचे प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी जळगावच्या जैन हिल्स येथे आयोजित ‘कृषी महोत्सवात’ पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेतीच्या क्षेत्रातील अद्ययावत जागतिक तंत्रज्ञान विविध पिकांच्या डेमो प्लॉटच्या माध्यमातून जैन इरिगेशनने शेतकऱ्यांसाठी ही प्रात्यक्षिके उभी केली आहेत. ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाधारित शेतीची कास धरली तरच चैतन्याचे व भरघोस उत्पन्नाचे मोठे संचित शेतकऱ्यांच्या हाती लागेल हे त्रिवार सत्य आहे. या महोत्सवाची आधुनिक तंत्रज्ञान आणि नवचैतन्य ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे. १४ जानेवारी २०२५ पर्यंत होणाऱ्या या महोत्सवाला शेतकरी बांधवांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले.
जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्या ‘संजीवन दिन’ निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिक्स इन वन ह्या संकल्पनेत ऊसाची शेती, कापूस पिकाची गादी वाफ्यावर ठिबक सिंचन, फर्टीगेशन व मल्चिंग फिल्म चा वापर करून लागवड केलेले क्षेत्र याचा समावेश आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस पिकाचे अधिक उत्पादन कसे मिळवावे हे तंत्रज्ञान, शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस यासारख्या बंदिस्त व नियंत्रित वातावरणातील केळी, संत्रा बागा बघितल्या जात आहेत. यामध्ये केळी, आंबा, जैन स्वीट ऑरेंज, संत्रा, पपई, हळद, आले, लसूण यासह भविष्यातील शेती फ्यूचर फार्मिंग, व्हर्टिकल फार्मिंग, एरोपोनिक, हायड्रोपोनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहता व अनुभवता येणार आहे.
कृषी महोत्सवात १२ बैलगाड्यांची संकल्पना –
आधुनिक काळात शेतीमध्ये बैल गाडी ही संकल्पना पुसट होत चालली आहे. ग्रामीण संस्कृतिचे जतन व्हावे आणि एक चांगला संदेश जावा यासाठी या महोत्सवात १२ बैल गाड्यांची संकल्पना उभारण्यात आलेली आहे. ग्रामीण भागात यात्रा किंवा विशिष्ट तिथीला १२ गाड्या एकमेकांना बांधून एखादी व्यक्ती त्या ओढत असते. त्या बैलगाडीवर गावातील लोक बसलेले असतात. याच संकल्पनेच्या धरतीवर आधुनिक शेतीच्या तंत्राची, ठिबक सिंचन, पाईप, पाईप फिटींग, फिल्टर्स इत्यादी बाबी, तंत्रज्ञान अशी जैन इरिगेशनची उत्पादने या गाड्यांवर पहायला मिळतील. सेल्फीसाठी “जैन हायटेक एक्स्प्रेस” कृषी रेल्वेची कलाकृतीही जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्टद्वारा उभारण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारी ही जैन हायटेक फार्मिंग एक्स्प्रेस कृषी क्षेत्रातील उज्ज्वल भवितव्याचं प्रतीकच आहे.
जैन हिल्स येथे या महोत्सवानिमित्त लागवड केलेले पिके त्यांचे माहिती फलके, त्या त्या विषयाचे तज्ज्ञ अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सज्ज आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीमध्ये नव चैतन्य फुलण्यासाठी टिश्युकल्चर, सीड, सिडलींग यांचेही तंत्र एकाच छताखाली पहावयास मिळते. या महोत्सवाला भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी करावी असे कळविण्यात आले आहे.