Awaj Marathi । जळगाव शहरात पहिल्याच दिवशी ४५ उमेदवारी अर्जांची विक्री ?
टीम आवाज मराठी, जळगाव । विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार, 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जळगाव शहरात पहिल्याच दिवशी ४५ अर्ज विक्री झाले आहेत. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांचे उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी कार्यालयात नामांकन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मात्र आज पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. अपक्ष वा विविध राष्ट्रीय, राज्य, विभाग स्तरीय पक्षांच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दोन दिवसातच मुहूर्त साधण्याचे संकेत मिळत आहेत. यासोबतच अर्ज दाखल करतेवेळी बड्या राजकीय नेत्यांची उपस्थिती वा समर्थकांच्या प्रचंड संख्येने शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी पदाधिकाऱ्यांकडून केली जात असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांसाठी मंगळवार, 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांना मंगळवार, 22 ते पुढील सप्ताहातील मंगळवार, 29 ऑक्टोबर दरम्यान शनिवार व रविवार असे शासकीय सुटीचे दिवस वगळता केवळ पाचच दिवस मिळणार आहेत. शनिवार व रविवार शासकीय सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारीचा ‘मुहूर्त’ साधला जाईल, असे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षांपूर्वी सप्टेंबर 2019 दरम्यान विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच निकाल जाहीर झाले होते. दरम्यान, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-शिवसेना या मित्र पक्षांनी निवडणूक एकत्रितरीत्या लढविली होती. मात्र विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत जाणे पसंत करीत 28 नोव्हेंबर 2019 रोजी 19 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अंतर्गत कलहामुळे शिवसेनेत फूट पडून 40 ते 45 आमदारांचा एक गट एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात वेगळा झाल्याने सरकार गडगडले. त्यानंतर शिवसेना शिंदे गट व भाजपा एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन झाले. पुन्हा काही महिन्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट वेगळा झाला आणि तो सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे राज्यात शिंदे शिवसेना व उबाठा शिवसेना असे शिवसेनेचे दोन आणि शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट, असे राष्ट्रवादीचे दोन म्हणजे एकाच पक्षाचे प्रत्येकी दोन गट तयार झाले. यात शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यासोबत भाजपा सत्तेत राहिली. विधानसभेचा कालावधी पूर्ण झाल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
यात भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस, शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेेस आणि उबाठा शिवसेना अशा प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांमध्ये प्रथमत: विधानसभा निवडणूक होत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा, शिंदे सेना व अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन, प्रहार अशा विविध पक्ष संघटनांकडून उमेदवारांची नावे जाहीर झाली आहेत.
तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस, शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाठा शिवसेना असे टप्प्यात, परंतु काही ठिकाणचे उमेदवारच अजून जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे सर्वच पक्ष शुक्रवार व सोमवारनंतरच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ‘वसुबारस’ सोमवार, 28 आणि मंगळवार, 29 रोजी ‘धनत्रयोदशी’ या दोन्ही दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याला बहुतांश उमेदवार प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीनुसार विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा व तालुका प्रशासन सज्ज आहे. विधानसभानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांना नामांकन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील 11 मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुव्यवस्थितरीत्या सुलभपणे पार पडेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
पहिल्याच दिवशी नेले 45 अर्ज
विधानसभा निवडणूक नामांकन अधिसूचना जाहिर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी जळगाव शहर विधानसभा क्षेत्रासाठी हिंदूस्थान पार्टी , काँग्रेस आयसह अन्य अपक्ष उमेदवारांसाठी 28 इच्छुकांनी 45 अर्ज नेले आहेत.
यात गोकूळ चव्हाण अपक्ष 1, सुरेश पांडूरंग पाटील सुनंदा संदानशिव यांच्यासाठी हिंदूस्थान जनता पार्टी 2, सचिन विष्णू घोडेस्वार अपक्ष 2, पंकज बोरोले अपक्ष 2, प्रदिप आव्हाड अपक्ष 4, शरिफ शफी बागवान प्रबुदध रिपब्लिकन पार्टी 4, रमेश खोडपे यांनी नरेद्र सोनवणे यांच्यासाठी अपक्ष 1, भरत सपकाळे अपक्ष 1, शेख आबीद यांनी मतीन शब्बीर पटेल यांच्यासाठी अपक्ष 1, विकास नेहेते अपक्ष 1, दिपक तळेले अपक्ष 1, मयुर कापसे अपक्ष 2, पंकज विरभान पाटील यांनी माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासाठी अपक्ष , पंकज पवार यांनी विशाल चंद्रकांत पाटील यांच्यासाठी अपक्ष 1, भूषण सूर्यवंशी यांनी ॲड.गोविंद जानकिराम तिवारी हिंदू महासभा 2, गोकूळ पाटील अपक्ष 1, राजेश जाधव यांनी डॉ.अश्विन शांताराम सोनवणे अपक्ष यांच्यासाठी 2, तौसिअ साबीर बागवान यांनी इसा शेख हमीद यांच्यासाठी अपक्ष 1, मेघनाथ सूर्यवंशी अपक्ष 1, तुषार कुळकर्णी यांनी डॉ.शांताराम तोताराम सोनवणे यांच्यासाठी अपक्ष 2, मोबीन पटेल यांनी मतीन शब्बीर पटेल यांच्यासाठी अपक्ष 1, महेश लक्ष्मीनारायण शर्मा अपक्ष 1, राजेश मंडोरे काँग्रेस आय 2, विनोद अढाळके अपक्ष 2, अविनाश चौधरी अपक्ष 1,मनोहर शिंदे यांनी आत्माराम मांगो सूर्यंवशी अपक्ष यांच्यासाठी 1, वसंत शंकर कोलते अपक्ष 1 आणि प्रविण जगन सपकाळे अपक्ष 1 असे 28 जणांनी 45 उमेदवारी अर्ज नेले असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विनय गोसावी यांनी म्हटले आहे.
पाचोरा 21 जणांनी 54 तर एरंडोलमधून नेले 2 अर्ज
पाचोरा विधानसभेसाठी 21 इच्छुक उमेदवार वा त्यांच्या समर्थकांनी सर्वाधिक 54 अर्ज नेले असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पाचोरा भूषण अहिरे यांनी म्हटले आहे. तर एरंडोल विधानसभा मतदार संघातून मधुकर कौतिक पाटील प्रस्तावक यांनी अमोल चिमणराव पाटील यांच्यासाठी शिवसेना शिंदे गट पक्षातर्फे आणि दत्तू रंगराव पाटील आडगाव ता.एरंडोल यांनी अपक्ष असे दोन अर्ज नेले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा एरंडोल निवढणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी म्हटले आहे.