जन्मदिनाचं सेलिब्रेशन की निवडणुकीची पूर्वतयारी… ?
चोपड्यात सागर ओतारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांने चर्चेला आले उधाण
आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा। २४ जून २०२३ । चोपडा शहरात सागर ओतारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध समाजिक कार्यक्रमांमुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांची पुर्व तयारी असल्याची चर्चा चोपडा शहरात होत आहे. वाढदिवस हे केवळ सेलिब्रेशनचे निमित्त नसुन आपली जबाबदारी वाढवणारा दिवस असल्याने त्याचे भान ठेवत आपण शहरातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात उपक्रम राबविल्याचे ओतारी यांनी सांगितले.
शहरात ठिकठिकाणी बॅनर्स
सागर ओतारी यांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स, बॅनर्स शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले होते. चोपडा शहरातील चौकाचौकात शुभेच्छा संदेश देणा-या बॅनर्समुळे अनेकांचे लक्ष वेधले जात होते. या बॅनर्समुळे ओतारी यांची सर्वसामान्य नागरिकांमध्ये असलेली लोकप्रियता वाढल्याची चर्चा सुरू आहे. कोणत्याही राजकीय पदावर नसतांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणा-या समर्थकांची वाढलेली संख्या यामुळे राजकीय क्षेत्रातील नेत्यांच्या देखील भुवया उंचावल्या आहेत.
जपले सामाजिक भान
वाढदिवसाचं औचित्य साधत सागर ओतारी यांनी सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला. शहरातील देवस्थानांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. तारामती नगरातील श्री साईबाबा मंदिर व श्री हरेश्वर मंदिरात त्यांनी पूजा केली. यानंतर राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. या राष्ट्रपुरुषांच्या विचारांवर आयुष्यभर मार्गक्रमण करण्याचा संकल्प देखील केलाय. उपजिल्हा रुग्णालयात व चोपडा शहरातील परिश्रम हॉस्पिटल येथे कन्या रत्नांना जन्म दिलेल्या मातांचे साडी चोळी, पुष्पगुछ, बाळाचे कपडे व पेढे देऊन त्यांनी सत्कार केला. त्यानंतर शहरातील अशोक नगर येथे ओंकारेश्वर महादेव मंदिर परिसरात वृक्षारोपण देखील केले. ओतारी मित्र परिवाराने साईबाबा मंदिर परिसरात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते. शिवसेना शहरप्रमुख आबा देशमुख यांची देखील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती होती. ओतारी यांच्या सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला. अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग होता.