टीम आवाज मराटी जळगान,दि.04-06-24-नाटक ही सातत्याने नव्याचा शोध घेणारी प्रक्रिया आहे, अनेक विविध फॉर्म एकत्र करून व स्त्री पात्रांना सोबत घेउन वेगळा प्रयोग करणे हेच कर्ण या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. परिवर्तन सारख्या संस्था देखील नेमकं हेच काम करत आहे. त्यांच्यासारखं सर्वांगीण काम करणारी संस्था आमच्या माहितीत नाही असे उद्गार कर्ण या नाटकाचे दिग्दर्शक कुलविंदर सिंग व यातील कलावंत यांनी व्यक्त केले . कर्ण या नाटकाचा प्रयोग नुकताच जळगावला झाला. त्या कलावंतांसोबत संवादाचा कार्यक्रम महावीर क्लास येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना या नाटकाचे लेखक दिग्दर्शक व कलावंत यांनी या नाटकाचा प्रवास, त्याची निर्मिती कथा याबद्दल खूप रोमहर्षक माहिती सर्व प्रेक्षकांना दिली . शिवाजी सावंत यांनी त्यांची मृत्युंजय ही कादंबरी मला त्यांनी 2005 साली दिली . त्यानंतर मी ती कादंबरी वाचल्यानंतर तीन वर्ष कोणताही चित्रपट नाटक काहीही पाहू शकलो नाही इतका मी झपाटून गेलो होतो . त्यानंतर मी हे नाटक लिहिलं व या नाटकाचे प्रयोग सुरू झाले. भारतातील अनेक कलाप्रकारांमध्ये स्त्रियांची भूमिका पुरुष करतात ही तर आपली लोक परंपरा आहे पण मग पुरुषांची भूमिका स्त्रियांनी का करू नये या विचाराने मी तीन मुलींना घेऊन हे नाटक नव्याने बसवले . मी रतन थियम यांच्यासोबत काम केलेले असल्याने थांगता, कलरी व इतर सर्व भारतीय परंपरातील विविध घाट वापरून या नाटकाची निर्मिती केली आहे . टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या या तीन मुली नाटक करायचं म्हणून आल्या आणि सहा महिने अविरत मेहनत परिश्रम केले . हे नाटक पूर्णतः शारीरिक हालचालींवर अवलंबून असल्यामुळे अनेक प्रकारच्या जखमा, अपघात हे सगळं सहन करून या तीन मुलींनी शरीर व मन तयार केले व त्यातून कर्ण ही कलाकृती आकाराला आली . दृश्य माध्यमातून भाषा ही गोष्ट फार महत्त्वाची नाही तर शारीरिक हालचाली व विविध घाटामधून आपल्याला असे पोहोचवता आल पाहिजे या कामी आपल्याला भारतीय शास्त्र संगीत व भारतीय शास्त्रीय नृत्याचा खुबीने वापर करता आला पाहिजे. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे भारतीय रंगभूमी आहे तर कलावंत असलेल्या तिन्ही मुलींनी आमचा एकूण जीवनाविषयी दृष्टिकोन अभिनयाच्या संकल्पना आणि रंगभूमी या सगळ्यांमध्ये अपरंपार बदल या नाटकामुळे झालेला आहे इतकं हे नाटक आम्हाला भिडलेल आहे. जळगावचा प्रेक्षक हा विलक्षण समज असलेला प्रेक्षक आहे अस आमचं स्पष्ट मत आहे . आमच्या नाटकाचा सर्वोत्कृष्ट प्रयोग परिवर्तनने आयोजित केलेल्या जळगावचा आहे हे आम्ही अभिमानाने सांगतो असं कलावंतांनी एकमुखाने सांगितलं. याप्रसंगी परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिल कांकरिया, अमरभाई कुकरेजा, नंदलाल गादिया, सुदिप्ता सरकार, मंजुषा भिडे तसेच रंगकर्मी राजेंद्र देशमुख , पियुष रावळ , चंद्रकांत अत्रे, आर्किटेक्ट शिरीष बर्वे , वर्षा चोरडिया , अजय पाटील , डॉ. अविनाश भोसले , हर्षाली चौधरी , अंजली पाटील पोर्णिमा हुंडीवाले यासह अनेक प्रेक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन हर्षल पाटील यांनी केले.