जळगाव

महा स्पीडस्टार : शोध महा वेगाचा’ महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोहिमेस मिळतोय उदंड प्रतिसाद

टीम आवाज मराठी जळगाव-९ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील पाच ठिकाणी होणाऱ्या या शोध मोहिमेत सहभाग घेऊन कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जळगाव दि.०५ प्रतिनिधी – जर तुम्ही वेगवान गोलंदाज आहात, तर ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार: शोध महा वेगाचा’ ही शोध मोहीम हाती घेतली आहे. ९ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील पाच ठिकाणी होणाऱ्या या शोध मोहिमेत सहभाग घेऊन कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या मोहिमेची अधिकृत घोषणा झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत हजारो खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवर (www.cricketmaharashtra.com) जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. यामध्ये समद फल्लाह, चारुदत्त कुलकर्णी, शिरीष कामठे, अनुपम संकलेचा, आदित्य डोळे, राजेश माहूरकर, प्रसाद कानडे, सुयश बुरकुल, अविनाश आवारे, मनीषा लांडे व कीर्ती धनवान यांचा समावेश आहे. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिकाधिक खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनीही जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फेसुद्धा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनेचे अॅपेक्स कौन्सिल सदस्य अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
या उपक्रमात पुरुष व महिला या दोन्हींच्या वरिष्ठ व कनिष्ठ गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. या दोन्ही गटातील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावामध्ये यायची संधी मिळेल. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असतील. त्या गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबवले जाईल. त्यामुळे ही केवळ शोध मोहीम नसून भविष्यात क्रिकेट विश्वाला दर्जेदार, सर्वात वेगवान गोलंदाज मिळावेत, यासाठीची एक चळवळ आहे.
असे आहे स्पर्धेचे वेळापत्रक
९ व १० मार्च ला नाशिक – गोल्फ क्लब ग्राउंड व छत्रपती संभाजीनगर – एडीसीए क्रिकेट ग्राउंड तसेच १६ व १७ मार्च ला नांदेड- नांदेड स्टेडियम, सोलापूर- इंदिरा गांधी स्टेडियम तर २३ व २४ मार्चला पुणे- गहुंजे स्टेडियम यातून महाअंतिम फेरी ही पुण्याच्या गहुंजे स्टेडियम येथे ३१ मार्च ला होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button