आवाज मराठी, जळगाव | ७ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून चक्क निवासी जिल्हाधिका-यांवर हल्ला करण्यापर्यंत वाळू माफियांची मजल पोहचली आहे. आतापर्यंत चक्क एका महिन्यात दोन महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची हिम्मत वाळू माफियांची वाढली आहे. मंगळवार दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास नशिराबाद ते तरसोद दरम्यान वाळूमाफियांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी अधिकाऱ्यांचे वाहन देखील फोडले आहे.
जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दर महिन्याला जिल्ह्यात कुठे ना कुठे वाळूमाफियांकडून महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला होत असतो. काही दिवसांपूर्वीच धरणगाव आणि एरंडोल येथे वाळूमाफियांनी महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. मंगळवारी रात्री अकरा वाजता घटनेची पुनरावृत्ती झाली असून जळगावच्या निवासी जिल्हाधिकाऱ्यांसह पदकावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना नशिराबाद ते तरसोद दरम्यान घडली आहे.
भुसावळकडून जळगावच्या दिशेने येत असलेले निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यासह तहसीलदार विजय बनसोडे व चालक यांनी रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी नशिराबाद गावाच्या पुढे अवैध वाळू वाहतूक करणारे एक वाळू डंपर अडविले. काही मिनिटांनी त्यांनी आणखी एक डंपर अडविले.
दोन डंपर अडविल्यानंतर तहसीलदार बनसोडे हे एक डंपर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात होते. नेमके त्याच वेळी एका चारचाकी आणि दुचाकीने काही वाळूमाफिया त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी थेट लोखंडी पाईपच्या साहाय्याने सोपान कासार आणि वाहनावर हल्ला चढविला.
हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात सोपान कासार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली झाली असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, डॉ.विशाल जैस्वाल यांच्यासह पथक जिल्हा रुग्णालयात पोहचले आहेत. पोलिसांनी काही हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून दोघांना ताब्यात घेतल्याचे समजते.