उमेश महाजन | आवाज मराठी एरंडोल | एरंडोल येथील तिन युवक कावड यात्रेनिमित्त श्रावण सोमवार असल्याने रामेश्वर येथे संगमावरील पाणी घेण्यासाठी गेले होते. यादरम्यान तीन तरुण पाण्यात बुडाल्याची घटना घडली असुन दोन तरुणाचे मृतदेह सापडले आहेत तर एकाचा शोध घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
श्रावण सोमवार निमित्त जिल्ह्यातील महादेव मंदीरात विविध कार्यक्रम साजरे होत आहे.अनेक भाविक भक्त कावड यात्रेचे आयोजन करून महादेव मंदीरावर दर्शनासाठी जात आहे. या अनुषंगाने एरंडोल शहरातील सुमारे १५० तरूण हे सोमवार दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी ४ वाजता शहरातील भगवा चौक येथून कावड यात्रा निघाली तसेच खोल महादेव मंदिरात काकड आरती करुन पायी कावड यात्रेद्वारे जळगाव तालुक्यातील श्री. क्षेत्र रामेश्वर येथील गिरणा, तापी व अंजनी या त्रिवेणी संगमावरील रामेश्वर महादेव मंदीरावर दर्शनासाठी व संगामावरील पाणी आणण्यासाठी गेले होते.तसेच यावेळी सर्व भक्तांनी संगमावरिल पाण्यात अंघोळ करुन महादेवाचे दर्शन घेतले.याप्रसंगी सागर अनिल शिंपी (२५),अक्षय प्रवीण शिंपी (२१) व पियूष रविंद्र शिंपी (२०) हे तिन तरुण पाण्यात बुडल्याचे सर्वांच्या लक्षात आले.तिघ तरुण हे एकाच परिवारातील असुन सागर शिंपी हा एकुलता एक मुलगा होता व तो बी.फार्मसी ला शिक्षण घेत होता,अक्षय व पियूष हा आय. टी.आय.चे शिक्षण घेत होते.दरम्यान सदर युवकांचा शोध घेण्यात आला असता दोघांचे मृतदेह आढळले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे समोर आले आहे. पट्टीचे पोहणाऱ्या तरूणांकडून बुडालेल्या तरुणांचा शोध घेणे सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीत उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेहांचा शोध सुरूच आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांशी संपर्क केला असता त्यांनी या दुर्घटनेला दुजोरा दिला आहे.
एरंडोल येथील रामेश्वर तालुका जिल्हा जळगाव येथे झालेल्या दुर्दैवी घटने उबाठा शिवसेना तर्फे उद्या एरंडोल बंदचे आवाहन करण्यात आले असून तरी उद्या दिनांक 22 /8 /2023 रोजी सर्व व्यापारी बंधू व व्यावसायिक यांना प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आवाहन शहर तालुका व जिल्हा शिवसेना उबाठातर्फे करण्यात आले आहे.