
टीम आवाज मराठी टीम | २० जुलै २०२३ | अंमली पदार्थ तस्करी आणि अवैध कामांविरोधात कारवाई केली जाईल. सोबत प्रशासनातील जे जे अधिकारी या गैरव्यवहारात दोषी असतील त्यांना बडतर्फ केलं जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्याबाबत सरकारने धोरण काय राबविले पाहिजे?, असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज विधान सभेत लक्षवेधी माध्यमातून उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी सभेत माहिती दिली. झोपडपट्टी विभागात अंमली पदार्थ सेवनाचे जास्त प्रमाणात आहे त्यामुळे राज्य सरकारने सदर भागातील पोलिसांची सुरक्षा वाढवायला पाहिजे असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलं.
अंमलीपदार्थ विरोधी पथकामध्ये मनुष्यबळ कमी आहे त्यासाठी भरती करणार का? आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यासाठी काही निरनिराळे धोरणे राबवणार का? असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केले. यावर प्रतिक्रिया देताना, संबंधित विभागासाठी १८ हजार जणांची भरती काढली असून त्यामुळे मनुष्यबळाची कमी पडणार नाही.” असं फडणवीस म्हणाले.
अंमली पदार्थांच्या किंमती जास्त प्रमाणात वाढल्या असून अनेक युवक वर्ग नशेच्या आहारी गेले आहेत. जोपर्यंत पोलीस यंत्रणा सतर्क होत नाही तोपर्यंत यावर आळा बसणार नाही. या अवैध धंद्याच्या बाबतीत पोलिसांना सगळी माहिती असते. पण त्यांना अधिकार दिले तर हा प्रकार बंद होऊ शकतो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे. पानवाल्याची दुकाने बंद करा, असे ड्रग्ज विकण्यासाठी पानवाला हा प्रमुख माध्यम आहे, त्यामुळे पानवाल्यांची दुकाने रात्री ११ वाजता बंद केली पाहिजेत अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.