अनिल पाटील, आवाज मराठी कोल्हापुर । २० जुलै २०२३। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज गुरुवार दि. 20 जुलै रोजी लाल बावटा संघटनेच्या वतीने कोल्हापूरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आलीत. बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांमुळे कामगरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने कामगारांचा आज संतापाचा उद्रेक पहायला मिळाला.
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सुमारे दिड महिना कोल्हापूर व इचलकरंजी कार्यालयाकडील नोंदणी अधिकाऱ्यांचे तसेच कर्मचाऱ्यांचे युजर आयडी व पासवर्ड बंद करून कामगार मंत्र्यांच्या सांगली जिल्ह्यातील युजर आयडी व पासवर्ड दिलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर व इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामकाज गेले दिड महिन्यांपासून ठप्प झाले आहे. त्यामुळे कामगारांमध्ये मोठा उद्रेक आहे. याच्या निषेधार्थ लाल बावटा संघटनेच्या वतीने कोल्हापूरातील सहाय्यक कामगार आयूक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आलीत. यावेळी मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयूक्त विशाल घोङके यानां देण्यात आले.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे,
1) आरोग्य तपासणीच्या नावाखाली नोंदीत बांधकाम कामगारांची तपासणी करून रिपोर्ट न देणाऱ्या कंपनीचा ठेका रद्द करा. त्याबदल्यात बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना सुरू करावी.
2) मध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर महीना २ हजार रुपये द्यावेत. तसेच मध्यान्ह भोजन योजनेची स्मार्ट कार्ड तालुकास्तरीय मेळावे घेऊन कामगारांना वाटप करावीत
3) घरकुल योजनेचे अर्ज मंजुर होऊनही त्यांचे अनुदान अध्याप खात्यावर वर्ग झाले नाही ते तात्काळ करावे. व कार्यालयाकडे दाखल झालेले घरकुल योजनेचे अर्ज तातडीने मंजुर करावेत.
4) लाभाचे अर्ज मंजुरचे मेसेज येऊनही खात्यावर रक्कम जमा झाली नाही त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करून रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा करावी.
5) कामगारांच्या नोंदणी, नूतनीकरण, व लाभाच्या अर्जाची तृटी आल्यास, ७ दिवसात तृटी अपडेट न केल्यास अर्ज रिजेक्ट होतो सदर अट तात्काळ रद्द करावी.
6) घरकुल योजनेमध्ये कामगाराच्या वडीलांच्या नावावर किंवा महीला कामगारांच्या सासऱ्याच्या नावावर जागा असल्यास समंती पत्रावर घरकुल मंजूर करावे.
7) ग्रेस पिरेड मधील कामगारांना नैसर्गिक, अपघाती मृत्यू लाभ,देण्यात यावेत
या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा व या कार्यालयाकडील सर्व नोंदणी, नुतनीकरण, व लाभाचे सर्वच अर्ज मंडळाने या कार्यालयाकडे युजर आयडी व पासवर्ड ची संख्या वाढवुन १४ ऑगष्ट २०२३ पर्यंत १०० टक्के कामकाज पुर्ण करावे अन्यथा १५ ऑगष्ट २०२३, स्वातंत्रदिनी कोल्हापूर जिल्ह्यातील साधारण ४० हजार बांधकाम कामगार मोर्चाने आपल्या कार्यालयावर येऊन बेमुदत महामुक्काम आंदोलन करेल याची नोंद मंडळाने व आपल्या कार्यालयाने घ्यावी, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे, जिल्हा जनरल सेक्रेटरी काॅम्रेङ शिवाजीराव मूगदूम, कॉ. प्रकाश कुंभार, कॉ संदीप सुतार, कॉ भगवानराव घोरपडे, कॉ विक्रम खतकर, कॉ शिवाजीराव मोरे यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.