अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासोबत भारतातून 12 संघाचा सहभाग; आज होईल उद्घाटन

जळगाव, दि. ०५ प्रतिनिधी : अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई-१७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. ६ रोजी संध्याकाळी ५ वाजेला या स्पर्धेचे उद्घाटन होईल. ही स्पर्धा दि. ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान होईल. सोमवारी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यांच्यासोबत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अॅपेक्स कौन्सिलचे सदस्य अतुल जैन, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे व पदाधिकारी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल व पदाधिकारी असतील.
सीआयएससीई बोर्डच्या अंडर-१७ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, गोवा, महाराष्ट्र, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, नॉर्थ इंडिया, वेस्ट इंडिया, पोर्टब्लेअर अंदमान निकोबार बेटसह दुबई या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासोबत 12 राज्यांचे क्रिकेट संघ सहभागी होत असून 260 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. साखळी व बाद पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या क्रिकेट स्पर्धेचे अनुभूती निवासी स्कूल मुख्य आयोजक आहेत. जैन इरिगेशन व जैन स्पोर्टस अकॅडमी मधील सहकारी त्यासाठी सहकार्य करत आहेत. साखळी सामने प्रत्येकी १५ षटकांचे असतील. तर उपांत्य व अंतिम सामने हे २० षटकांचे होतील. साखळी पद्धतीमध्ये १५ सामने होतील. अनुभूती आंतरराष्ट्रीय निवासी स्कूल, जैन ड्रीम स्पेस-मेहरूण तलावाजवळ तसेच एमके स्पोर्टस-सावखेडा च्या दोघंही मैदानांवर सामने रंगणार आहेत.
ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये सामने..
सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ही ए, बी, सी, डी अशा चार ग्रृप मध्ये होईल. यात ‘ए’ ग्रृपमध्ये पोर्टबेअर अंदमान निकोबार, महाराष्ट्र, ओव्हरसीस, उत्तराखंड, ‘बी’ गृप मध्ये ओडीसा, नॉर्थ वेस्ट, पश्चिम बंगाल, ‘सी’ ग्रृपमध्ये बिहार अॅण्ड झारखंड, तामिळनाडू पी. ए. निको, मध्यप्रदेश, ‘डी’ ग्रुपमध्ये कर्नाटक अॅण्ड गोवा, नॉर्थ इंडिया, केरळ संघ असतील. यात ‘ए’गटात चार तर बी, सी, डी तीन गटांमध्ये प्रत्येक तीन संघ खेळतील. प्रत्येक गटातून प्रथम क्रमांकाचा संघ उपांत्य फेरीत लढत देतील. उपांत्य फेरीत ‘ए’ विरूद्ध ‘डी’ तसेच ‘बी’ विरूद्ध ‘सी’ असे सामने होतील. यातील विजेते अंतिम फेरीसाठी खेळतील.