जळगावराज्य

सामूहिक शेतीला तंत्राची जोड देऊन जंगल समृद्ध करू – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जैन हिल्स ला पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांच्या ‘मसाला समूह’ कार्यशाळा संपन्न

जळगाव दि.२० प्रतिनिधी – ‘संघर्ष करून आदिवासी उभा राहत असतो आपल्याला चांगल्या कामासाठी संघर्ष करायचा आहे. यातून वैयक्तिक वनहक्क धारक आपण बनलात मात्र फक्त जमीन घेऊन विकास होत नाही तर ती कमी पाण्यात, कमी वेळेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा वापर करून कशी नफ्याची करता येईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एकमेकांना सोबत घेऊन सामूहिक शेतीचे तंत्र समजून विश्वासू पुरवठादार होऊन जंगल व शेत समृद्ध करूया,’ असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जैन हिल्स येथे आदिवासी विकास विभागाच्या वतीने जैन इरिगेशनच्या सहकार्यातून आयोजीत पेसा क्षेत्रातील वैयक्तिक वनहक्क धारकांना (IFR) सामुहिकरित्या द्यावयाच्या योजनांच्या अनुषंगाने, क्षेत्रनिहाय समूह (Cluster/spice Cluster) ‘मसाला समूह’ तयार करणेबाबत आयोजीत कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.  

यावेळी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, जिल्हा कृषी अधीक्षक पद्मनाथ म्हस्के, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप झोड, अग्रणी बँकेचे प्रणवकुमार झा, मत्सविभागाचे अतुल पाटील, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, कृषी विज्ञान केंद्र महेश महाजन, प्रकल्प अधिकारी अरूण पवार, करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन व महापुरूषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यशाळेची सुरवात झाली.

दोन दिवसीय कार्यशाळेत रावेर, यावल, चोपडा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील आदिवासी वनहक्कधारक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदिवासी बहूल भागातील योजनांची माहिती दिली. प्रास्ताविक अरूण पवार यांनी केले. प्रतिभा शिंदे यांनी आदिवासी हे डोंगराशी लढून जगतो तो संघर्षातून रचनात्मक काम करतो. सातपुड्याच्या विकासात शेतीतून नंदनवन फुलवू आणि जंगल समृद्ध करू यासाठी जैन इरिगेशनच्या शेती संशोधन प्रात्यक्षिक केंद्रातील शेती करण्याची पद्धती आदिवासींनी समजून घेतली ती आत्मसात करून जीवनात परिवर्तन घडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.

जिल्हाधिकारी पुढे बोलताना म्हणाले की, वैयक्तीगत वन हक्काच्या जमिनी मिळाल्यानंतर संबंधित आदिवासींच्या जीवनाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कायमचा सुटलेला दिसत नाही. धान्याऐवजी रोख भांडवल कसे मिळेल यासाठी प्रयत्न झालेले दिसत नाही. तीन सहा महिन्यांमधून उत्पन्न मिळत राहिले पाहिजे त्यापद्धतीने पीक पद्धत लागवड केली पाहिजे. सेंद्रीय शेतीला समूह शेतीची, गट शेतीची जोड दिली पाहिजे. त्यातून नियोजित कल्स्टर उभं करता येईल. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्रानुसार कार्य केले पाहिजे. जैन हिल्सच्या शेती संशोधन केंद्रातील शेती पाहून त्यातून कमी पाण्यातून उत्पन्न वाढीची शेती कशी करता येईल, शेत मालाचे संरक्षण आणि तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल हे शिकले पाहिजे. संघटित होऊन गट तयार करून त्याला कंपनीचे स्वरूप दिले पाहिजे जेणे करून आपण विश्वासू पुरवठादार होऊ आणि सकारात्मक हेतूने संघर्ष हा आपला, कुटुंबाचा, राज्याचा आणि देशाच्या विकासासाठी केला पाहिजे असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.

जैन इरिगेशनच्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा यांनी कांदा, टोमॅटो, मिरची, हळद, लसूण, आलं यासह अन्य मसाले पिकांबाबतच्या करार शेतीची माहिती दिली. बारमाही शेतीसाठी फक्त घाम गाळून चालणार नाही तर आपण तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. ठिबक, स्प्रिंकलर्सच्या माध्यमातून विकास साधता येतो. शेती लहान असो की मोठी त्याला हवामान बदलाचा फटका बसतोय त्यावर तंत्रज्ञानातून मात करता येऊ शकते असे गौतम देसर्डा म्हणाले.

जि. प. सीईओ मिनल करनवाल यांनी मनोगत व्यक्त करताना, शेतकरी नेहमी चिंतेत असतो शेतातील पिक येणार की नाही आले तर बाजारात चांगला भाव कसा मिळेल मात्र जैन इरिगेशनने करार शेती करून हक्काचे मार्केट उपलब्ध करुन दिल्याने ते शेतकऱ्यांसाठी चांगले पाऊल असून त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी फायदा करुन घ्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

शेतकऱ्यांच्या वतीने जनाबाई बारेला, मुस्तफा तडवी, पिंटु बारेला, फुलसिंग बारेला यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या वतीने ताराचंद बारेला, कस्तुरीबाई यांनी मनोगत व्यक्त केले. युनूस तडवी यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पाटील यांनी आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button