जळगाव

केळी क्लस्टरच्या अंमलबजावणी नियोजनासाठी जैन हिल्स येथे ‘केळी पीक चर्चासत्र’

फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम अंतर्गत केळी पिकाचे अंतर मूल्यांकन अहवाल तयार करणे करिता नियोजन सभा

जळगाव, दि. १७ (प्रतिनिधी) – गेल्या ३० वर्षामध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी टिश्युकल्चर, ठिबक सिंचन, फर्टिगेशन व हायटेक पॅकेज ऑफ प्रॅक्टीसेस, फ्रुट केअर मॅनेजमेंट, पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट आणि निर्यात या क्षेत्रात मोठी भरारी घेतली असून केळी पीक क्लस्टर योजनेमुळे जळगाव जिल्हा हे केळी निर्यातीचे हब म्हणून जगाच्या बाजारपेठेत नावलौकीक मिळवेल.

निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे अलीकडेच जळगाव जिल्ह्यात बनाना क्लस्टरला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली त्या पार्श्वभूमिवर जैन हिल्स येथे १७ जानेवारी रोजी फलोत्पादन समूह विकास कार्यक्रम अंतर्गत केळी पिकाचे अंतर मूल्यांकन अहवाल तयार करण्याकरीता मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन वन औषधी महामंडळ, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली ‘केळी पीक चर्चासत्र’ आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य फलोत्पादन वन औषधी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल महिंद्रकर, केंद्र सरकारचे माजी उद्यान आयुक्त व कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, एनएचबीचे डॉ. अलोक कुमार शर्मा, अधीक्षक कृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक चे संभाजी ठाकूर जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी, आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी तसेच अखिल भारतीय केळी उत्पादक संघाचे सचिव श्री वसंतराव महाजन, प्रगतिशील केळी उत्पादक शेतकरी, कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद व पाल केळी संशोधन केंद्राचे प्रमुख व क्षेत्रीय कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमास केळी उत्पादक व निर्यातदार क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती होती. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राची सुरवात झाली. मान्यवरांचे स्वागत झाले. प्रास्ताविकात कुरबान तडवी यांनी केळी क्लस्टरच्या सभेची पार्श्वभूमी सांगितली.

प्रकल्प संचालक वैभव शिंदे यांनी बनाना क्लस्टरच्या विविध मॉ़डेल्स व त्यासाठी पात्र संस्था, शेतकरी व कशा पद्धतीने क्लस्टरची अंमलबजावणी केली जाईल हे सांगितले, ज्यामध्ये नोडल एजन्सी, इम्प्लीमेटींग एजन्सी, तांत्रिक सल्ला संस्था, शेतकरी समुहाचा सभाग या सर्व बाबींवर सविस्तर मांडणी केली.

राष्ट्रीय बागवाणी बोर्डाचे उपसंचालक डॉ. अलोक कुमार यांनी कुठल्या घटकाला कसे सहाय्य केले जाईल, कोल्डस्टोरेज, पॅक हाऊ, कुलव्हॅन, टिश्युकल्चर लॅबोरेटरी, नवीन एफपीसी व सहकारी संस्था या संदर्भात मार्गदर्शन केले.

आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ व जैन इरिगेशनचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. के. बी. पाटील यांनी जळगाव व सोलापूर आणि एकंदरीत भारत देशाला केळी निर्यातीच्या प्रचंड संधी असल्याचे बोलले.
टिश्युकल्चर, ठिबक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञानाने केळी उत्पादन करणारा महाराष्ट्र जगात अव्वल आहे परंतु फ्रुटकेअर, पॅक हाऊस पॅकींग व आंतरराष्ट्रीय मानांकने केळी पॅक केली तर रशिया व युरोप बनाना क्लस्टरची मोठी मदत होईल.

जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनाचे हब आहे. जळगाव जिल्हा हा इतर जिल्ह्याचा मार्गदर्शक म्हणून पुढे आला त्यातून सोलापूर जिल्हा केळी निर्यातदार म्हणून उदयास आला. महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्येही केळी चांगली पिकू लागली. भरूच, राजपिपला, सुरत येथून केळी निर्मात होऊ लागली. अनंतपुर, कडप्पा, कर्नुलमधूनही केळीची निर्यात होऊ लागली. २०१२ नंतर थेणी हे देशाचे केळी निर्यातीचे हब बनले परंतु दुर्दैवाने केळीवर रोग पडला. संपूर्ण थेणीमधून केळीचे क्षेत्र संपले. केळी निर्यातीचे हब सोलापूर आणि जळगावकडे वळले. जळगाव हे केळीचे क्लस्टर बनले प्रचंड मोठी संधी निर्माण झाल्याचे डॉ. के.बी. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
महाराष्ट्र फोलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर यांनी शेतकरी, व्यापारी, निर्यातदार व या सभेत प्रमुख काम करणाऱ्या संस्थांनी बनाना क्लस्टरमध्ये काम करावे. आपल्याला विविध योजना उपलब्ध होणार आहे त्याचा फायदा अवश्य घ्यावा. जळगावला केळी क्लस्टर म्हणून केंद्र व राज्य शासनाची भरभक्कम मदत मिळणार आहे. या पाठोपाठ नाशिकला द्राक्षे, कोल्हापूरचे डाळींब, रत्नागिरी सिंधुदुर्ग यासाठी देखील विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या क्लस्टर साठी शेतकऱ्यांनी फायदा आवश्यक घ्यावा, काही पूर्तता वेळेत पूर्ण करून द्याव्यातअसे आवाहन केले.

माजी उद्यान आयुक्त डॉ. एच. पी. सिंग यांनी निर्याती सोबत देशांतर्गत सुद्धा पुरवठा साखळीत सुधारणेची अपेक्षा व्यक्त केली. आभार दीपक ठाकूर यांनी मानले. या कार्यशाळेला विशाल अग्रवाल, शरद महाजन, वसंतराव महाजन, प्रशांत महाजन, अंकुश चौधरी, अनिल सपकाळे, शशांक पाटील, कमलाकर पाटील, विनोद बोरसे, सुनील देवरे, डी.एस. पाटील यांच्यासह जिल्ह्यातील कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय कृषी अधिकारी हर्षदा देसले, डॉ. बाहेती, डॉ. नेहते, डॉ. महाजन, डॉ. गुजर, डॉ. मेंढे यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button