जळगावराजकीय

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर मतदारसंघांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड. रोहिणी एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, पातोंडी, बेलखेड, धामणदे, भोकरी, नरवेल, पिंप्रि भोजना, लोहारखेडा, बेलसवाडी, पिंप्री नांदू या गावांमध्ये जन आशिर्वाद पदयात्रा काढून मतदारांचे आशिर्वाद घेऊन मतदारांशी संवाद साधत त्यांना मतदानरूपी आशिर्वाद देण्याची विनंती केली.


यावेळी गावागावांत रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटलेली दिसली. पदयात्रेत तरुणांचा मोठया प्रमाणावर समावेश होता. ‘रोहिणीताई आगे बढो.. हम तुम्हारे साथ है’ आणि ‘विकासाची एकच ग्वाही रोहिणीताई’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गावागावात आबालवृद्धानी रोहिणी खडसे यांना विजयासाठी आशिर्वाद दिले तर महिलांनी रोहिणी खडसे या आमच्या मधीलच एक भगिनी असून, त्यांना महिलांच्या प्रश्नांची जाण असल्याने त्या ते सोडवतील असा विश्वास असल्याचे सांगून, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असल्याच्या भावना व्यक्त केल्या. प्रत्येक गावात रोहिणी खडसे यांच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभत आहे.


यावेळी रोहिणी खडसे यांनी मतदारांसोबत संवाद साधताना त्या म्हणाल्या, एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना, जो शब्द दिला तो पाळला. खामखेडा, पिंप्री नांदू पुलाचा शब्द दिला तो पाळून ठराविक कालावधीत पुलांचे काम पूर्ण केले. विद्यमान लोकप्रतिनिधींनी फक्त कागदी आश्वासने दिली. पाच वर्ष सत्ताधारी पक्षात राहूनही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे मतदारसंघाचा विकास ठप्प झाला आहे. मतदारसंघांच्या विकासाला गती देण्यासाठी, मतदारसंघातील शेतकरी, कष्टकरी, महिला – युवकांच्या प्रश्नांसाठी व हक्कांसाठी त्यांचा आवाज बनून विधानसभेत या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याला माझं प्रथम प्राधान्य असेल. हा माझा शब्द असल्याचे सांगून, यासाठी तुमच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची गरज आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान यंत्रावरील अनुक्रमांक ३ चे ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंती रोहिणी खडसे यांनी मतदारांना केली.

यावेळी किशोर चौधरी मतदारांशी संवाद साधताना म्हणाले आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून पिंप्री नांदु येथे तापी नदीवर भव्य पुलाचे निर्माण करण्यात आले. त्यामुळे रावेर आणि मुक्ताईनगर तालुका जवळ आला या पुलामुळे नुसते दळणवळणच वाढले नाही तर नातेसंबंध जवळ येऊन वृध्दींगत झाले. व्यापार वाढला त्यामुळे हा पुल परिसराच्या विकासासाठी चालना देणारा ठरला. आमदार एकनाथराव खडसे यांनी मतदारसंघाचा विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, राजकारण, समाजकारण करताना कधीच कोणतेही जातीभेद केले नाहीत. सौ. सुनिताताई चौधरी यांना पंचायत समिती सभापतीपदाची संधी दिली. गुजर समाजातील अनेक जणांना त्यांनी पक्ष संघटना, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेतृत्वाची संधी दिली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून रोहिणी खडसे या राजकारण समाजकारण करत असुन त्यांच्याकडे विकासाची दुरदृष्टी आहे मागिल काळात ग्राम समित्या स्थापन नसल्याने शेतकऱ्यांना पोकरा योजनेचा लाभ मिळत नव्हता त्यावेळी त्यांनी पंचायत समिति ते मंत्रालया पर्यंत केलेल्या पाठपुराव्याने तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहिणी खडसेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला होता अशा शेतकरी कष्टकरी महिला युवकांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या रोहिणी खडसे यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन किशोर चौधरी यांनी केले.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ म्हणाले, आमदार एकनाथराव खडसे यांनी तीस वर्ष मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना मतदारसंघांत जातीय सलोखा, शांतता अबाधित ठेवत पक्षिय मतभेद न करता मतदारसंघांचा सर्वांगिण विकास साधला. केळी उत्पादनात अग्रेसर असलेल्या आपल्या या भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी मंत्री असताना केळी पिक विमा योजना लागु केली, केळीचे मार्केटिंग व्हावे, केळी निर्यातीला चालना मिळावी, कोल्डस्टोरेजची निर्मिती होऊन कमी दरात ते शेतकऱ्यांना मिळावे यासारख्या सुविधा निर्माण होण्यासाठी केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी त्यांनी पाठपुरावा केला, कमी दरात टिश्यू ची रोपे ऊपलब्ध व्हावी केळी पिकांवर संशोधन व्हावे यासाठी केळी संशोधन केंद्र कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी मंजूर केले होते परंतु नंतरच्या सत्ताधाऱ्यांनी याला ब्रेक लावला.

एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघांच्या विकासाचा शेतकरी कष्टकरी यांच्या उत्थानाचा वसा रोहिणी खडसे या चालवत असून, मतदारसंघांतील रखडलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या हक्काचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना बहुमताने निवडून देऊन विधानसभेत पाठवा, असे आवाहन विनोद तराळ यांनी मतदारांना केले.
यावेळी ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उबाठा) पक्ष, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button