मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, महाविकास आघाडीच्या उमेदवार ॲड रोहिणी एकनाथराव खडसे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी तर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे जन आशिर्वाद रॅली काढून ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला रॅलीचा समारोप कॉर्नर सभेने करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी रॅलीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद देत रोहिणी खडसे आणि पदाधिकाऱ्यांचे हर्षोल्हासात स्वागत केले.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून उचंदे येथे अनेक विकास कामे झाली आहेत. भविष्यातही ग्रामस्थांच्या मागणीनुसार कामे करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. उचंदे गावातील ग्रामस्थ स्व. प्रल्हाद भाऊ पाटील, स्व. पंढरीभाऊ पाटील, स्व. शामरावजी तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली कायम शरद पवार साहेबांच्या विचारांचे अनुयायी राहिले असून, नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देत आलेले आहेत. मागील निवडणुकीत शरद पवार साहेबांच्या आदेशाने तुम्ही विद्यमान लोकप्रतिनिधींना साथ दिली त्यावेळी त्यांनी विविध आश्वासने दिली पण गेले पाच वर्ष सत्तेत राहूनही त्यांनी आश्वासनांची पुर्ती केली नाही. मतदार संघात फक्त कागदोपत्री कामे करून शासकीय निधीचा अपहार केल्या जात आहे. लोकप्रतिनिधी स्व खर्चातून शेतरस्त्यांचे कामे केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. प्रत्यक्षात शेतरस्त्यांसाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत शासकिय निधी काढला गेला आहे. मी लोकप्रतिनिधी यांना सुलवाडी ते मुंढोदे पुल केल्यास सत्कार करेल असे आव्हान दिले होते.
त्यावेळी त्यांनी ते आव्हान स्वीकारून पुलाचे काम पूर्ण करेल आणि त्या पुलावरूनच मत मागायला येईल असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी नाबार्ड अंतर्गत पुलाला मंजुरी आणि पन्नास कोटी रूपये निधी मिळाल्याचे सांगुन पुलाचे भूमिपूजन करून आता रोहिणी खडसेंनी माझा सत्कार करावा असे सांगितले होते. मी आजही माझ्या शब्दावर ठाम असून लवकर पुल पुर्ण झाला तर त्यांचा सत्कार करेल. नुसती मंजुरी मिळून फायदा नाही त्यांनी सांगितल्या नुसार नाबार्ड अंतर्गत पुल मंजुरीचा आणि निधी मंजुरीचा शासन निर्णय दाखवावा. या पुलाला नाबार्डमधुन नाही तर ०४ हेड अंतर्गत मंजुरी मिळाली असून या हेडवर निधीची उपलब्धता फार कमी असते. यामधून निधी मिळून पुल पुर्ण व्हायला दहा ते पंधरा वर्ष लागतील. मग त्यांचा पुलावरून मत मागायला जायचा शब्द कुठे गेला? नाथाभाऊ यांनी खामखेडा पुलाचा शब्द दिला होता पाच वर्षात तो पुर्ण करुन दाखवला होता म्हणून आता विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतात मतदारसंघाला पाच हजार कोटी रूपये निधी दिला त्या पाच हजार कोटी निधी अंतर्गत झालेल्या विकास कामांची माहिती द्यावी असे रोहिणी खडसे यांनी सांगून मतदार संघातील अनागोंदी कारभार थांबवून मतदारसंघाचा गेल्या पाच वर्षात रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आ. एकनाथराव खडसे साहेब, रविंद्र भैय्यासाहेब पाटील, अरुणदादा पाटील आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लढवत असलेल्या निवडणुकीत मतदानरूपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी देण्याची रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना विनंती केली.
यावेळी कॉर्नर सभेत बोलताना तालुका अध्यक्ष यु. डी. पाटील सर यांनी गेल्या निवडणुकीत आम्ही शरद पवार साहेबांच्या आदेशाने विद्यमान लोकप्रतीनिधींना निवडून दिले परंतु त्यांनी आमचा भ्रमनिरास केला शरद पवार यांची साथ सोडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांची सुद्धा साथ सोडली गेल्या पाच वर्षात मतदारसंघात सर्वत्र भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार सुरु असल्याचे सांगुन मतदार संघाच्या विकासासाठी रोहिणी खडसे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी विशाल महाराज खोले यांनी मतदारांशी संवाद साधताना, राज्यात जाती धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु हा संतांचा महाराष्ट्र असुन कट कारस्थानाना बळी पडणारा नाही तेच चित्र आपल्या मतदारसंघांत सुद्धा आहे परंतु मतदारसंघाची शांतता टिकवायची आहे. आपल्या मतदारसंघांत साडी वाटप करून माता भगिनींचे मत विकत घेण्याचा प्रयत्न झाला परंतु खोट्या आमिषाला बळी पडू नका आपल्या भगिनी रोहिणी खडसे यांना विजयी करा असे आवाहन केले.
याप्रसंगी विनोद तराळ यांनी मार्गदर्शन करताना आपला परिसर हा केळी उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर असून शेत रस्त्यांची समस्या आहे, पुनर्वसनाची कामे बाकी राहिली आहेत ते रोहिणीताई खडसे या निश्चित सोडवतील अशी ग्रामस्थांना ग्वाही देऊन रोहिणी खडसे यांना गावातून मताधिक्य देण्याची विनंती केली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटिल, पवनराजे पाटिल, शिवसेना उबाठा पक्षाचे नेते मनोहर खैरनार, अविनाश पाटील, निलेश पाटील, विकास पाटील,रामभाऊ पाटील, माणिकराव पाटिल, साहेबराव पाटील, साहेबराव धनगर, किरण तायडे, राजेंद्र भोलाने,सद्दाम शेख आणि ग्रामस्थ व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.