जळगाव

श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय अध्यक्षपदी अशोक जैन यांची एकमताने पुनर्निवड

पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘ब’ दर्जा झाला प्राप्त

टीम आवाज मराठी, जळगाव | ०३ जुलै २०२३ | गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पद्मालयच्या श्री गणपती देवस्थानच्या अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची पुढील पाच वर्षांसाठी एकमताने पुनर्निवड झाली. श्री गणपती मंदीर देवस्थान पद्मालय येथे रविवारी २ जुलै २०२३ रोजी मंदिर विश्वस्तांची बैठक पद्मालय येथे संपन्न झाली. त्यात सर्व विश्वस्त उपस्थित होते. अध्यक्ष अशोक जैन यांच्या नावाची घोषणा विश्वस्त अमित पाटील यांनी केली. विश्वस्तांच्यावतीने पुनर्नियुक्त अध्यक्ष अशोक जैन यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. अशोक जैन यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस महाराष्ट्र शासनाच्यावतीने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकताच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला.

१ जुलै २०१८ रोजी पहिल्यांदा गणपती मंदिर देवस्थानच्या विश्वस्त मंडळात निवड करण्यात आलेली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने ही सभा बोलवण्यात आली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. श्रीक्षेत्र पद्मालयाच्या विकासासाठी भक्कम नेतृत्वाची आवश्यकता असून त्यासाठी अशोक जैन यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड करण्यात यावी, असा ठराव संस्थानचे विश्वस्त अमित पाटील यांनी मांडला. या ठरावास सर्व विश्वस्तांनी एक मताने मंजुरी दिली. त्यास भिका लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अनुमोदन दिले. या वेळी संस्थानचे माजी अध्यक्ष अर्जुन पाटील, आनंदराव पाटील व अमृत कोळी गोकुळ देशमुख, भिका पाटील, शिरीष बर्वे, डॉ. पी.जी. पिंगळे, अमित पाटील, गणेश वैद्य आदी विश्वस्त, अशोक पाटील डोणगावकर उपस्थित होते.


देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होणार – अशोक जैन
पर्यटकास पद्मालयाचे पौराणिक महत्त्व चित्र व म्युरल प्रदर्शनाच्या माध्यमातून दिसेल असे नियोजन आहे. या संस्थानला ‘ब’ दर्जा मिळाल्यामुळे नियोजीत कामांना वेग येऊन मंदिर आणि परिसराचा विकास होईल. या संस्थानचा सर्वतोपरी विकास साध्य करण्याचा संकल्प विश्वस्तमंडळाने घेतला आहे. भारतवर्षात या देवस्थानास वेगळी झळाळी प्राप्त होईल अशी खात्री आहे असे पुनर्निवड झालेले अध्यक्ष अशोक जैन म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button