पाडवा पहाट” या मैफिलीत सुरांची अतिशबाजी
जळगाव प्रतिनीधी- सालाबादप्रमाणे यावर्षी पण स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित दिवाळी “पाडवा पहाट” या कार्यक्रमाचे २३ वे पुष्प आज रोजी महात्मा गांधी उद्यानात गुंफले गेले. या कार्यक्रमास कैलासवासी नत्थु शेठ चांदसरकर चारिटेबल ट्रस्ट, प्लायवूड व भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन यांचे सहकार्य लाभले.
सुरुवातीला वरुण नेवे यांनी प्रतिष्ठानच्या परंपरेनुसार गुरुवंदना सादर केली. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांनी प्रमुख उपस्थित मेजर नाना काका वाणी, राजेंद्र कुलकर्णी व निशा भाभी जैन यांचे स्वागत केले. यांच्यासोबतच आजचे कलाकार सुरमणी धनंजय जोशी यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर सर्व कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनंजय जोशी यांना तबल्याची संगत कार्तिकस्वामी दहिफळे, संवादिनीची साथ श्रीराम जोशी, तर पखवाजाची साथ अमोल लाकडे व मंजिरीची साथ प्रसन्न भुरे या युवा कलावंतांनी केली, आणि सुरू झाली एक एक सुरेल मैफल.
सुरुवातीला अहिर भैरव रागातील “अलबेला साजन आयो रे” ही तीन तालातील बंदीश सादर केली. त्यानंतर त्याला जोडूनच जय जय गौरीशंकर नाटकातील “जय शंकरा गंगाधरा” या नाट्यपदाने मैफिलीत रंगत भरली. पं. भीमसेन जोशींनी अजरामर केलेली “तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल” सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेले “अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग” हा अभंग सादर केला “पद्मनाभा नारायणा” या गीता बरोबरच “मर्मबंधातली ठेव ही प्रेम मय ” या नाट्यपदाने मैफिलित रंग भरला. “बाजी मुरलिया बाजे रे” “संत भार पंढरीत” “कानडा राजा पंढरीचा” “अवघी गरजे पंढरपुर” या अभंगांनी मैफिल एका उंचीवर जाऊन पोहोचली. “तमनीशे चा सरला” या भैरवीने मैफलीची सांगता झाली. तत्पूर्वी गेल्या वर्षभरात प्रतिष्ठानच्या वतीने आपली कला सादर करणाऱ्या युवा व आश्वासक अशा स्थानिक कलावंतांचा सत्कार करण्यात आला व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
पाडवा पहाट कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नुपूर चांदोरकर खटावकर यांनी केले दीर्घकाळ स्मरणात राहील अशा मैफिलीचे आयोजन प्रतिष्ठानच वतीने करण्यात आले.