पाचोरा -तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील गडद नदी पात्रात आंघोळीसाठी गेलेला बिहार राज्यातील ३० वर्षीय तरुण मजूर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. या तरुणाचा मृतदेह संगमेश्वर येथील गडद नदी पात्रात आढळून आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथे पाण्याची टाकी बांधण्यासाठी बिहारधील टुणटुन राजेंद्र सहाणे (वय ३०) रा. मधीली, ता. बराडी, जि. कटिहार तसेच जमुनाकुमार राजेंद्र सिंह, गोविंदकुमार सिंह, जयंतकुमार सिंह, राजेंद्र सिंह, रोहितकुमार सिंह (सर्व रा. महादेव गंज, ता. साहेबगंज, जि. साहेबगंज (झारखंड) हे मजुर आले होते. १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सर्व मजूर टाकळी येथील गडद नदी पात्रात आंघोळीसाठी गेले होते. यातील टुणटुण राजेंद्र सहाणे हा तरुण खोल पाण्यात बेपत्ता झाला होता. दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी टुणटुण सहाणे या मजुराचा मृतदेह काही अंतरावरील संगमेश्वर येथील गडद नदी पात्रात तरंगताना आढळून आला. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात टाकळी बुद्रुकचे पोलिस पाटील विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.