जळगावातील अजिंठा चौफुलीवरील घटना
टीम आवाज मराठी, जळगाव दि. 9 ऑक्टोबर 2024 ;- शहरातील अजिंठा चौफुली येथे आज ९ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली असून मयत महिलेचे पती जखमी झाले. अनिता सुनील राणे (वय ५२, रा.सदगुरुनगर, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिता सुनील राणे यांचे रिंगरोड भागातील घराचे काम सुरु असल्याने पाण्याची गरज भासते. रिंगरोड परिसरात बुधवारी सकाळी पाणी पुरवठा झाल्यामुळे, पहाटे ३ वाजता पाणी भरण्यासाठी राणे दांम्पत्य भल्या पहाटे रिंगरोडकडे जात असतांना हा अपघात घडला . अनिता राणे या बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पती सुनील बाबुराव राणे यांच्यासोबत सतगुरु नगरातून दुचाकीने रिंगरोड भागात बांधकाम सुरु असलेल्या त्यांच्या घराकडे पाणी भरायला जात होते.
त्याचवेळी अजिंठा चौकात आले असताना समोरून आलेल्या एका अज्ञात वाहनाने राणे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत राणे दांम्पत्य दुर फेकले केले. त्यात अनिता राणे यांचे डोकं थेट धडापासून वेगळे झाले. त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर पती सुनील राणे यांनाही मार लागला. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यालगत कोणीही नव्हते.
त्यामुळे दांम्पत्याला उडविणाऱ्या वाहनचालकाने घटनास्थळाहून पळ काढला.एका रिक्षा चालकाला अपघात झाल्याचे कळल्यानंतर याबाबत त्याने एमआयडीसी पोलिसांना कळविले. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिता राणे यांच्या पश्चात पती, मुलगा तन्मय, मुलगी आदिती असा परिवार आहे.