||• महावीर वाणी 5 •||• दि. ०६/०८/२०२४ मंगळवार
संघर्ष हेच उत्कर्षाचे द्वार - परमपूज्य सुमितमुनिजी महाराज साहेब
आवाज मराठी जळगाव दि.६/०८/२०२४- कुठलाही संघर्ष हा आपल्या कर्मउदयातून समोर येत असतो. पुर्वजन्माचे ते संचित असते. आत्माचे ते कर्मफळ असते. सुख दु:खाचे स्वागत हे चांगल्या मनाने केले पाहिजे. कारण संघर्ष ज्याठिकाणी नाही त्याठिकाणी उत्कर्ष नाही. साधना आणि संघर्ष जेथे नाही त्याठिकाणी ज्ञानही वाढत नाही. वास्तविक दु:खांपेक्षा काल्पनिक दु:खांनी मनुष्य पिडीत आहे. त्यामुळे दुसऱ्यांकडे बघण्याची दृष्टी आपण सकारात्मक ठेवली पाहिजे. सुख दु:खाशी अतिथीप्रमाणे लोकव्यवहार केला पाहिजे. जे समोर आहे ते महत्त्वाचे असून त्याचा स्वीकार करुन आनंद घेतला पाहिजे. कारण दु:ख हे परिस्थितीवर नाही तर मनस्थितीवर अवलंबून असते. मी सुखी, आम्ही सुखी ह्यापेक्षा सर्व सुखी ही लोकभावना मनात आणा, त्यानुसार जीवनाकडे बघा! असा महत्त्वपुर्ण संदेश शासनदीपक परमपुज्य सुमितमुनिजी महाराज साहेब यांनी धर्मसभेमध्ये श्रावक-श्राविकांना दिला.
सुख म्हणजे काय आणि दु:ख म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर चार मार्गाने समजून घेता येते. आपल्या पेक्षा लहान असेल त्याकडे बघून जगा, मोठ्यांकडे पाहून पुढे यशस्वी व्हावा, चांगल्यासाठी प्रयत्न करत रहा आणि जे चुकिचे होईल त्यासाठीसुद्धा तयार रहा यातून सुखी जीवनाची कला शिकता येते. आताच्या युगात दुसऱ्यांशी तुलना आणि स्पर्धा हे दु:खाचे सर्वात मोठे कारण आहे. भ्रष्टाचार टाळा आणि सहनशिल बना. असे विचार आरंभी परमपूज्य भुतीप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सांगितले.