गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी ‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन
दि. २४, २६ व २७ मार्च रोजी भाऊंच्या उद्यानात तर दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी महात्मा गांधी उद्यानात सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात आयोजित करण्यात आले आहे.
टीम आवाज मराठी जळगाव-येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची सांगता होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी इच्छुकांना चरखा चालविण्यास शिकविणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते. जळगावकरांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
दि. २४, २६ व २७ मार्च रोजी भाऊंच्या उद्यानात तर दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी महात्मा गांधी उद्यानात सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.