नाटक हे सशक्त माध्यम असून परिवर्तन सारख्या संस्था ते टिकवतील
परिवर्तन जिगिषा सन्मान महोत्सवात उलगडला प्रवास
टीम आवाज मराठी जळगाव-नाटक हे प्रभावी व सशक्त माध्यम आहे व ते सजगपणे करायची कृती असून वेगवेगळ्या माध्यमांचा कितीही रेटा आला तरी ते टिकेलच. जळगावची परिवर्तन सारखी संस्था नाटक इथे जगवते आहे, अशा शब्दात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
संजीवनी फाउंडेशन संचलित परिवर्तन आयोजित “परिवर्तन जगिषा सन्मान महोत्सवाला ” आजपासून सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ” प्रवास जिगीषाचाअनुभव आमचा ” या विषयावर मुलाखत घेण्यात आली. याप्रसंगी चंद्रकांत कुलकर्णी व ज्येष्ठ नाट्यलेखक प्रशांत दळवी, माजी माहिती संचालक अजय आंबेकर हे सहभागी झाले होते. 40 वर्ष जिगीषाची या विषयी बोलताना नाट्य प्रवासातील अनुभव व जिगीषाच्या स्थापनेपासूनचा अनुभव त्यांनी मांडला. याप्रसंगी बोलताना प्रशांत दळवी यांनी नाटक लिहिताना आपल्यावर असलेल्या औरंगाबाद सामाजिक चळवळींविषयी व वडील ज्येष्ठ पत्रकार बाबा दळवी यांच्या विचारांचा व घरातील वातावरणाचा , वैचारिक वारशाचा माझ्या लेखनावर याचा खूप मोठा प्रभाव पडल्याचा याप्रसंगी उल्लेख केला. एका संस्थेचं सामूहिकरीत्या स्थलांतर हे दुसऱ्या मोठ्या शहरात होतं आणि ते केवळ स्थलांतरण न राहता उत्तम उत्तम निर्मिती करण्याचे केंद्र बनत, याविषयी लेखक आणि दिग्दर्शकांनी आपल्या अनुभवातून मांडले. या प्रसंगी हर्षल पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला . मंचावर परिवर्तन प्रेक्षक सभासद योजनेचे प्रमुख अनिश शहा, अनिल कांकरिया व परिवर्तनच्या मंजुषा भिडे उपस्थित होत्या. परिवर्तन संस्थेला जीगिशाचा महोत्सव करावासा वाटतो कारण या संस्थेची नाट्यपरंपरेशी परिवर्तनच नातं असल्याने एक चांगला महोत्सव जळगाव शहरात या निमित्ताने होतोय ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असं मत डॉ. रेखा महाजन यांनी व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला.
महोत्सवात उद्या
जेष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत व अभिनेते वैभव मांगले आणि “संज्या छाया ” या नाटकातील कलावंतांसोबत चर्चा सायंकाळी 5 वाजता गणपती नगर मधील रोटरी हॉल या ठिकाणी होणार आहे. महोत्सवासाठी भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशन, रतनलाल सी बाफना ज्वेलर्स व रोटरी क्लब यांचे सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी नारायण बाविस्कर , शंभू पाटील, विनोद पाटील, विनोद अजनाडकर, मनोज पाटील , राहुल निंबाळकर, अक्षय नेहे , प्रवीण पाटील, भगवान भोई सोनाली पाटील, सुदिप्ता सरकार जयश्री पाटील आदी प्रयत्नाशील आहेत.