अशोक जैन यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान
कराड येथील ४१ वे स्वातंत्र्यसैनिक अधिवेशन व माजी सैनिक भव्य मेळाव्यात पुरस्कार प्रदान
उंडाळ (कराड) दि. १८ प्रतिनिधी – उंडाळ येथील स्व. दादा उंडाळकर ५० व्या सुवर्ण महोत्सवी स्मृती दिनानिमित्त आयोजित ४१ वे स्वातंत्र्य संग्राम व माजी सैनिक अधिवेशनात जैन इरिगेशन सिस्टीम ली चे अध्यक्ष अशोक जैन यांना स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार गोव्याचे माजी मुख्यमंत्री व भारत सरकारचे माजी कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख विश्वस्त उदयसिंह उंडाळकर, ट्रस्टचे विश्वस्त विजयसिंह पाटील, आमदार महेश शिंदे, प्रा. गणपतराव कणसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक उदयसिंह पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा सुयोग्य वापर कसा करायचा ते सांगून त्यांच्या जीवनात अमुलार्ग बदल भवरलाल जैन यांनी ठिंबक सिंचनाद्वारे क्रांती करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केले. त्यांनी कायम शेतकरी हाच केंद्रबिंदू मानला आणि त्यासाठीच आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या शेती आणि शेतकरी यांच्याविषयीच्या अतूलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारने पद्मश्री देऊन गौरव केला. त्यांच्यानंतर अशोक जैन हा वारसा पुढे नेत आहेत आणि लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या या कार्यासाठी नक्कीच पद्मविभूषण देऊन गौरव व्हायला व्हवा अशी भावना रमाकांत खलप यांनी व्यक्त केली.’
हा पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक जैन यांनी मनोगतात सांगितले की, भारतीय स्वातंत्र्यढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक, ज्यांना आदरपूर्वक ‘स्वातंत्र्यवीर’ संबोधलं जातं त्या आदरणीय दादासाहेब उंडाळकर यांना विनम्र अभिवादन करतो. ‘जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले.’ राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कृतिशील देशभक्तीचा खोलवर प्रभाव स्वातंत्र्य सैनिकांच्या मनावर ठसला होता. शब्दांना आचरणाची भरभक्कम जोड असल्यावरच माणसं नतमस्तक होतात. गांधीजी म्हणायचे, ‘अहिंसा ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी शक्ती आहे. ही माणसाने तयार केलेल्या अत्यंत शक्तिशाली शास्त्रापेक्षाही अधिक शक्तिशाली आहे.’ गांधीजींचा मार्ग अनुसरून हजारो, लाखो देशभक्तांनी स्वातंत्र्य युद्धात स्वतःला झोकून दिलं. त्यात दादासाहेब उंडाळकर हेसुद्धा अग्रभागी होते. आपल्या देशातील काही परिवार असे आहेत ज्यांची सुवर्ण अक्षरांनी नोंद घेतली पाहिजे, त्यात उंडाळकर परिवार आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. वडिलांनी अंगीकारलेलं व्रत सुपुत्रानेही जाणीवपूर्वक स्वीकारणं ही किती महत्त्वाची बाब आहे.
‘जे जे उत्तम, उदात्त म्हणती, ते ते शोधत रहावे जगती’ या भावनेतूनच जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशन तर्फे सेवासाधनतेतून मानवतेचे मूल्य जीवापाड जपले जात आहे. सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा अशा विविध स्तरांवर आमच्या ट्रस्टचे सेवाभावी काम सुरू असते. “एक दाणा पेरला तर हजारो दाणे पदरात पडतात…एक थेंब वाचवला तर हजारो थेंबांचे दान पडते.. एक झाड मायेनं वाचवलं तर हजारो- लाखो पानांच्या छायेत प्राणीमात्रांचं जीवन जातं.” वडील भवरलालजी जैन यांनी ह्या विचारांचा संस्कार आम्हाला दिला. जगाचं कल्याण करण्याआधी स्वत:ला संस्कारशील, संस्कृतीशील, शिस्तबद्ध घडवावं लागतं आणि स्वत:चा शोध तर मनापासून सुरू होतो. जे स्वत:चा शोध घेऊ शकत नाही ते इतरांच्या कल्याणाचा विचार करूच शकत नाही. श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंनी आधी स्वत:चा शोध घेतला. शेतकऱ्यांचं हित आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य दिले. संस्कारच माणसाला माणुसकीचा धर्म शिकवितो. यातूनच सामाजिक बांधिलकी हाच माणुसकी धर्म मानला जातो. कृतिशील आचरणातून ‘समाजाचे काम हे समाजावर ऋण नसून कृतज्ञपणे केलेली अल्पशी परतफेड असते’
“ऋण जन्मदात्या माता-पित्याचं.. ऋण या मातीचं, या मातृभूमीचं.. ऋण या समाजाचं, या लोकांचं.. ऋण इथल्या पाण्याचं, निसर्गाचं, पर्यावरणाचं..” या विचारांवर श्रद्धा ठेवून जैन इरिगेशनचं काम अखंडपणे सुरू असल्याचे अशोक जैन म्हणाले. आभार प्रा. गणपतराव कणसे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
चौकट
‘स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर सामाजिक पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ, गुळाची भेली, मानपत्र आणि रूपये ५१ हजार रोख असे स्वरूप आहे. या पुरस्काराची रक्कम न स्विकारता अशोक जैन यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या वतीने रूपये ५ लाख जाहिर करून एकत्रित रुपये ५ लाख ५१ हजार स्वातंत्र सैनिकांच्या विविध उपक्रमांसाठी उपयोग करण्याची विनंती केली.’
फोटो ओळ – स्व. दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना प्रदान करताना गोव्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप, शेजारी स्व. दादा उंडाळकर स्मारक समितीचे मुख्य विश्वस्त अॅड. उदयसिंह पाटील, विश्वस्त विजयसिंह पाटील व मान्यवर पदाधिकारी