पायपीट टाळण्यासाठी शिक्षकांनी दिल्या सायकली
चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथील शिक्षकांची अनोखा उपक्रम
आत्माराम पाटील, आवाज मराठी चोपडा | २३ जून २०२३ |
चोपडा तालुक्यातील कर्जानेे येथील चौथी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी पाच किलोमीटरची पायपीट करीत चुंचाळे येथील पाचवीच्या वर्गात जावे लागत होते. अदिवासी विद्यार्थ्यांची अडचण चुचाळे येथील शिक्षकांना कळली. आणि त्यांनी स्वखर्चातून बारा विद्यार्थ्यांना सहा सायकली घेऊन देत एक आदर्श निर्माण केलाय.
चुंचाळे येथील नुतन माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी स्वखर्चातून या विद्यार्थ्यांना सहा सायकली घेऊन दिल्याने जवळपास बारा अदिवासी विद्यार्थ्यांची होणारी पायपीट संपली आहे. या विद्यार्थ्यांसाठी माणुसकी दाखवत शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी या शिक्षकांनी आदर्श निर्माण केलाय. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पावसाला सामोरे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून चुंचाळे येथे एक स्वतंत्र खोलीची निर्मिती देखील करून दिलीये. या विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून द्यावी अशी संकल्पना येथील शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी मांडली होती.
दरम्यान विद्यार्थ्यांना सायकल वाटप प्रसंगी शिक्षण मंडळ चहार्डी येथील चेअरमन शामराव पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील, तसेच केंद्र प्रमुख उत्तमराव चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शाम भाऊ आणि शिक्षक उपस्थित होते.