उमेश महाजन, आवाज मराठी एरंडोल | २७ सप्टेंबर २०२३ | एरंडोल: तालुक्यातील नागदुली येथे दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात आरोपीने उघड्या घरात प्रवेश करून ९० हजारांची रोकड लंपास केली. याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
नागदुली येथील रहिवासी योगेश यादव कोळी यांचे नागदुली गावाबाहेर एरंडोल- म्हसावद रस्त्याला कटलरी दुकान व पिठाची गिरणी आहे. योगेश व त्याची पत्नी हे पिठाची गिरणी व कटलरी दुकानावर गेले होते. त्यांचा मुलगा व मुलगी हे घरी अंगणात खेळत होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत त्यांच्या उघड्या घरात घुसून ९०हजारांच्या रोकडवर हात मारला. रात्री ९ वाजेच्या सुमारास कोळी हे दुकान बंद करून घरी परत आल्यावर घरच्या परदीवरील स्टील चा डबा त्यांना दिसला नाही. आजूबाजूला शोध घेतला असता घराच्या मागील बाजूस नाल्यात स्टीलचा डबा फेकलेला आढळुन आला. त्यावेळी ९०हजार रुपये रोकड चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि एरंडोल पोलिस स्टेशन ला जाऊन त्यांनी फिर्याद दिली. या घटनेबाबत पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील व जुबेर खाटीक हे पुढील तपास करीत आहेत.