आत्माराम पाटील | आवाज मराठी | दिनांक २० सप्टेंबर २०२३ चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत समिती चोपडा, भगिनी मंडळ चोपडा, संचलित समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील क्षेत्रकार्य वैजापूर, शेनपाणी, मुळ्यावतार, खाऱ्यापाडाव गट व शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहार जनजागृती कार्यक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले.
पोषण आहार रॅलीचे उद्घाटन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, वैजापूर येथे करण्यात आले. सदर रॅलीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान चोपडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय धनगर यांनी भूषवले. सदर कार्यक्रमास समाजकार्य महाविद्यालयाचे क्षेत्रकार्य पर्यवेक्षक आशिष गुजराथी, नारसिंग वळवी, वैजापूर आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व्ही.डी.माळी, अधिक्षक एस्.आर्. देवराज, वैजापूर बीट अंगणवाडी पर्यवेक्षक जयमाला शिरसाठ, आडगाव बीट अंगणवाडी पर्यवेक्षक पूनम ठाकरे, वैजापूर आश्रम शाळेतील शिक्षक तडवी मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी, क्षेत्रकार्याचे विद्यार्थी व आश्रम शाळेतील विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय धनगर यांनी सकस आहार कोणता, किती वेळा खायचे, कोणत्या वेळेस खायचे व त्याचे फायदे काय याविषयी विवेचन केले. त्यामध्ये त्यांनी हिरवी भाजी पुरेशा प्रमाणात खायला हवी. तसेच शरीरामध्ये प्रथिने व लोहाचे पुरेसे प्रमाण असल्यास आपण कशा पद्धतीने निरोगी राहतो व त्यासाठी कोणता आहार घ्यावा याविषयी विस्तृत असे मार्गदर्शन केले.
खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे आपले आरोग्य कशा पद्धतीने धोक्यात येते याविषयी देखील त्यांनी विवेचन केले. आपल्या देशामध्ये अन्नधान्य भरपूर येते परंतु तरीदेखील आपल्या देशात कुपोषण आहे त्याचे कारण अन्नधान्याचा तुटवडा नव्हे तर चुकीच्या सवयी आणि चुकीच्या आहार पद्धती असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.
त्यानंतर पूनम मॅडम यांनी मैद्याचे पदार्थ खास करून ब्रेड, बिस्कीट जास्त प्रमाणात खाऊ नये याविषयी माहिती सांगितली. तीन प्रकारचे पांढरे पदार्थ शरीराला घातक असतात. त्यामध्ये मीठ, साखर आणि मैदा यांचा समावेश होतो. हे पदार्थ आपण कमी प्रमाणात खायला पाहिजे असे प्रतिपादन केले. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे आपल्याला विविध प्रकारच्या व्याधी जडतात हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन तडवी मॅडम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी जीवन कौशल्यांची माहिती सांगितली. महिन्यातून तीन वेळेस जीवन कौशल्यांच्या सत्राचे आयोजन करण्यात येते. तसेच आपण आपल्या वैयक्तिक सवयी बदलून आपल्या आरोग्य कशा पद्धतीने चांगले ठेवू शकतो. याविषयी त्यांनी विविध उदाहरणांचा वापर करून स्पष्टीकरण केले. तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक आहाराविषयी त्यांनी सखोल अशी माहिती दिली व विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले.
त्यानंतर नारसिंग वळवी यांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. सकस आणि पौष्टिक आहाराबरोबरच आपली स्वच्छता किती महत्वाची आहे, आपण जो आहार घेत आहोत तो चांगल्या दर्जाचा आहे किंवा नाही याविषयी त्यांनी विस्तृत असे विवेचन केले.
सदर रॅलीचे नियोजन क्षेत्रकार्य पर्यवेक्षक आशिष गुजराथी यांनी केले. त्यांनी रॅलीच्या आयोजनासंदर्भात विद्यार्थ्यांकडून नियोजनबद्ध कार्यवाही करून घेतली. महिला मंडळ व्हॉलंटरी स्कूल, चोपडा येथील उपशिक्षक जितेंद्र जोशी व हर्षल वाघ यांनी रॅलीच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. व आश्रम शाळेपासून रॅलीला सुरुवात झाली. सदर रॅलीमध्ये शेत्रकार्याचे विद्यार्थी व आश्रम शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणाऱ्या घोषणांचे फलक होते. गावातील मुख्य चौक व मुख्य रस्त्यांवरून सदर रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक घोषणा देत. लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. शेवटी पुन्हा आश्रम शाळेच्या परिसरात राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप झाला.
रॅली नंतर क्षेत्रकार्याचे विद्यार्थी व अंगणवाडी सेविका अनिता पिंप्राळे, गीताबाई बारेला, जानुवी बारेला, मोहाबाई बारेला, ईमलाबाई पावरा यांनी वैजापूर गावात गृहभेटी दिल्या. गृहभेटी देत असताना त्यांनी गरोदर महिलांचे व कुपोषित बालकांचे याविषयी सर्वेक्षण केले व सर्वेक्षणादरम्यान आढळलेल्या गरोदर महिला व कुपोषित बालकांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
पोषण आहार जनजागृतीच्या या संपूर्ण कार्यक्रमात उदबोधनपर व्याख्यान, रॅली, सर्वेक्षण व प्रत्यक्ष मार्गदर्शन इत्यादी माध्यमातून निश्चितच लोकांमध्ये आरोग्य आणि आहार विषयक जनजागृती निर्माण होईल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.