भाजपच्या पहिल्या यादीत पाच आमदारांची नावे

रावेर मधून अमोल जावळे यांना मिळाली संधी

आवाज मराठी, प्रतिनिधी जळगाव | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने  राज्यात आपल्या एकूण 99 ठिकाणचे उमेदवार जाहीर करत आघाडी घेतली. पक्षाने जळगाव जिल्ह्यातील विद्यमान असलेल्या आपल्या चारही आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर रावेरमधून अमोल जावळे यांना संधी देत पाच जागांवर शिक्कामोर्तब केले आहे. या 99 उमेदवारांची नावे जाहीर करीत भाजपाने निवडणूकीत राज्यसह जिल्ह्यात आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

जळगाव जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला असून जामनेर मधून सलग सहावेळ विजयी झालेले राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीष महाजन, भुसावळ मधून तीन वेळा निवडून आलेले संजय सावकारे, जळगाव शहरातून दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करीत असलेले सुरेश उर्फ राजुमामा भोळे आणि चाळीसगावमधील विद्यमान आमदार मंगेश चव्हाण अशा सर्व विद्यमान आमदार असलेल्या शिलेदारांना संधी दिली आहे. दरम्यान, रावेर विधानसभा मतदार संघातून लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यावर सुद्धा पक्षाने विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल जावळे हे दिवंगत माजी खासदार व आ.हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव असून त्यांनी हरिभाऊ यांच्या निधनानंतर पक्ष कार्यात स्वतःला वाहून घेत केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना ही उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

जळगाव शहर मतदार संघात  होती पक्षांतर्गत  चढाओढ :

जिल्ह्यातील गिरीशभाऊ महाजन, मंगेशदादा चव्हाण व संजय सावकारे या आमदारांच्या विरोधात पक्षातून कुणीही उमेदवारीचा दावा केलेला नसल्याने इथे दुमत नव्हतेच.मात्र जळगाव शहर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आ.राजुमामा भोळे यांच्या विरोधात इतरांची उमेदवारी मागणीसाठी पक्षांर्गत चढाओढ होती. माजी उपमहापौर डॉ.अश्विनभाऊ सोनवणे,राज्य मार्केटिंग फेडरेशनचे संचालक रोहितदादा निकम,सुनील खडके यांनी सुद्धा उमेदवारीसाठी दावेदारी केल्याने मामांपुढे धाकधूक होती,परंतु आता उमेदवारीची माळ गळ्यात पडल्याने आ. राजूमामांना मैदान मोकळे झाले आहे. दरम्यान,रावेर मधून सुद्धा अमोल जावळे यांच्यासोबतच यावलचे डॉ.कुंदनराव फेगडे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंगशेठ सराफ,पद्माकर महाजन आणि भरत महाजन हे स्पर्धेत होते. तथापि लोकसभेला रक्षाताई खडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देतांना पक्षाने अमोल जावळे यांना आमदारकीचा दिलेला शब्द खरा ठरवला आहे.

नाराजांच्या भूमिकेकडे लक्ष :
जळगाव शहरातून भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून अत्यंत जोरकसपणे तयारीत असलेले पण उमेदवारी मिळवू न शकलेले डॉ.अश्विनभाऊ सोनवणे यांची भूमिका काय राहील ? याकडे लक्ष राहणार आहे.रोहितदादा निकम यांच्या शहरातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात जाण्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु होत्या,इकडे शहर विधानसभेची जागा लढण्याच्या तयारीत असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वतंत्र लढण्याचे ठरविल्यास श्री. निकम तुतारी हाती घेऊन मैदानात येतात किंवा कसे काय याची उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button